Tue, Aug 04, 2020 14:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  दिवसात उच्चांकी  34,214 पॉझिटिव्ह

 दिवसात उच्चांकी  34,214 पॉझिटिव्ह

Last Updated: Jul 17 2020 1:46AM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशात कोरोना संक्रमणाचा कहर काही केल्यास थांबण्याची चिन्हे दिसत नसून, उलट त्याचा विळखा अधिकच घट्ट होत असल्याचे दिसत आहे.  दिवसागणीक कोरोनाबाधितांची उच्चांकी भर पडत आहे. गेल्या चोवीस तासांत देशामध्ये 34,214 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर या संक्रमणामुळे 676 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांसह नागरिकांचीही चिंता वाढली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत देशात तब्बल 34 हजार 214 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर 676 रुग्णांचा मृत्यू झाला. 20 हजार 783 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना विविध रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे 10 लाख 4 हजार 383 झाली आहे. यातील 6 लाख 36 हजार 541 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर 3 लाख 42 हजार 237 रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 25 हजार 605 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर 63.25 टक्के झाला आहे. तर कोरोनामुक्ती तसेच मृत्यूचे प्रमाण हे अनुक्रमे 96.09 टक्के, 3.91 टक्के नोंदवण्यात आले आहे.

सर्वाधिक कोरोना प्रभावित  महाराष्ट्रासह (7,975), तामिळनाडू (4,496), कर्नाटक (3,176), आंध्र प्रदेश (2,432), दिल्ली (1,647), उत्तर प्रदेश (1,659) तसेच पश्चिम बंगालमध्ये (1,589) कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. या राज्यांच्या पाठोपाठ तेलंगणा (1,597), बिहार (1,328),  गुजरात (915), राजस्थान (866), केरळ (623) तसेच मध्य प्रदेशात (638) कोरोनाबाधितांची भर पडली.

मागील चोवीस तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक 233 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक 87, तामिळनाडू 68, आंध्र प्रदेश 44, दिल्ली 41, पश्चिम बंगाल 20, तेलंगणा 11, गुजरात 10 तसेच मध्य प्रदेशात 9 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील मृत्यू दर हा 4 टक्के नोंदवण्यात आला आहे. तर जगाच्या 4.40 टक्के मृत्यू दराच्या तुलनेत गुजरातमधील कोरोना मृत्यू दर सर्वाधिक म्हणजे 4.75 टक्के नोंदवण्यात आला आहे.

बुधवारी दिवसभरात देशातील 3 लाख 42 हजार 237 नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशात 1 कोटी 27 लाख 39 हजार 490 नागरिकांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

बीएसएफमधील 68 जवानांना कोरोनाची लागण

गेल्या एका दिवसात बीएसएफमधील 68 जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बीएसएफमधील कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे 2 हजार 93 झाली असून, यातील 1 हजार 60 जवानांनी कोरोनावर मात मिळवली आहे. 1 हजार 24 जवानांवर उपचार सुरू आहेत. तर आयटीबीपीमध्ये 35 जवानांमध्ये कोरोना संसर्ग आढळला आहे. आयटीबीपीतील 356 जवानांनी कोरोनावर मात मिळवली आहे. 348 जवानांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

डॉक्टरांसाठी ‘आयएमए’कडून ‘रेड अ‍ॅलर्ट’ जारी

कोरोना संसर्गासोबत दोन हात करताना आतापर्यंत देशभरात 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) दिली आहे. ‘आयएमए’ने ‘रेड अलर्ट’ जारी करून रुग्णालये तसेच वैद्यकीय प्रशासकांना डॉक्टरांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ‘आयएमए’कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोनाविरोधातील युद्धात आघाडीवर लढत असलेल्या 1 हजार 302 डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली. तर 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला. यातील 73 डॉक्टरांचे वय हे 50 वर्षांहून जास्त नव्हते. 35 ते 50 वयोगटातील 19 आणि 35 हून कमी वय असलेल्या सात डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.