Sat, May 30, 2020 13:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › झोपडपट्ट्यांमध्ये शिरला कोरोना

झोपडपट्ट्यांमध्ये शिरला कोरोना

Last Updated: Mar 30 2020 1:29AM
मुंबई : काशिनाथ म्हादे

उच्चभ्रू वस्तीत असणारा कोरोना विषाणू दाटीवाटीने असलेल्या मुंबईच्या झोपडपट्ट्यांत अखेर पसरला. यामुळे कोरोनाबाधितांमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या तपासणीत 99 कोरोनाग्रस्त, तर 283 संशयित आढळले आहेत.

झोपडपट्ट्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. घरे एकामागोमाग एक लागून आहेत. यामुळे, कोरोना वेगाने पसरला. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. संसर्गाचा विळखा दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांना बसू नये यासाठी पालिकेने मिशन झोपडपट्ट्या राबवायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवडाभरात 60 हजार 678 झोपड्यांचे सर्वेक्षण केले. यात 2 लाख 43 हजार 384 लोकांची वैद्यकीय तपासणी केली. यामध्ये 99 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तर 283 जण संशयित आढळून आले आहेत. संशयितांवर घरच्या घरी उपचार केले जात असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशात विशेष काळजी घेतली जात आहे. महापालिकेचे डॉक्टर, नर्सेस तसेच अग्निशमन यंत्रणा आदी यंत्रणा तासन्तास अथक परिश्रम घेत आहेत. 24 तास जागी राहणार्‍या मुंबईत 55 ते 60 टक्के नागरिक झोपडपट्ट्यांत राहतात.  बिल्डिंगमध्ये राहणार्‍या रहिवाशांना स्वताला सुरक्षित अंतर ठेवणे शक्य आहे. मात्र दाटीवाटीने एकमेकांना खेटून उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्याच्या दारात पोहचलेल्या या संसर्गाला थोपवण्यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. ज्या विभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे, तेथे पालिकेची यंत्रणा तात्काळ पोहचून उपाययोजना सुरू केली आहे. 

या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य खात्याने मुंबईतील झोपड्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. सुमारे 55 टक्के लोक झोपडपट्टी भागात राहतात. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन 60 हजार 679 झोपड्यांचे सर्वेक्षण केले. यात 2 लाख 43 हजार 384 लोकांची वैद्यकीय तपासणी केली. यामध्ये 99 जणांना कोरोनाची लागण तर 283 जण संशयित आढळून आल्याचे वास्तव समोर आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर संशयितांवर वैद्यकीय टीमची देखरेख ठेवण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सोडियम डायक्लोराईड

गर्दीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुंबईतील वर्दळीची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे, फळ भाजी मार्केट, रुग्णालय आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण्यावर भर दिला आहे. 11 हजार 80 लीटर सोडियम डायक्लोराईडमध्ये 5 लाख 54 हजार लीटर पाणी मिक्स करून फवारणी केली जात आहे. 24 प्रभागात अग्निशमन दलामार्फत ही कामगिरी बजावली जात आहे