Thu, Sep 24, 2020 10:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईचे ‘नाईट लाईफ’ पडणार लांबणीवर?

मुंबईचे ‘नाईट लाईफ’ पडणार लांबणीवर?

Last Updated: Jan 20 2020 1:47AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी 26 जानेवारीपासून मुंबईत ‘नाईट लाईफ’ सुरू होणार असल्याची घोषणा केली असली तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाईट लाईफच्या बंदोबस्ताबाबत अद्याप पोलिसांची तयारी झाली नसल्याचे स्पष्ट केले. स्वतः गृहमंत्र्यांनीच ही माहिती दिल्यामुळे नाईट लाईफची तारीख लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाजी पार्क येथील एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांना त्यांनी ही माहिती दिली.

नाईट लाईफबाबत राज्य मंत्रिमंडळात चर्चा झालेली नाही. 22 जानेवारी रोजी तसा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर गृह विभाग व संबंधित विभागांच्या तयारीचा आढावा घेऊन नाईट लाईफला मंजुरी मिळेल, असा अंदाज आहे.

आता मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्यामुळे नाईट लाईफला मान्यता मिळेल व 26 जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी चर्चा होती. पण, गृहमंत्री देशमुख यांनी पोलिसांची तयारी नसल्याचे सांगितल्यामुळे नाईट लाईफची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे हे नाईट लाईफबाबत आग्रही असल्यामुळे मुंबई महापालिकेने 2016 मध्ये त्यास मंजुरी दिली होती. पालिकेच्या परवानगीनंतर राज्य सरकारचीही त्यास मान्यता आवश्यक आहे. 2016 मध्ये युतीचे सरकार होते. त्यामुळे मान्यता तातडीने मिळेल, अशी चर्चा होती. पण, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली नव्हती.

 "