Mon, Sep 21, 2020 10:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लडाखमध्ये चीनची घुसखोरी, संरक्षण खात्याच्या वेबसाईटवरील माहिती काही तासांतच डिलीट

लडाखमध्ये चीनची घुसखोरी, संरक्षण खात्याच्या वेबसाईटवरील माहिती काही तासांतच डिलीट

Last Updated: Aug 07 2020 1:11AM
नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलएसी) लडाखमध्ये चिनी सैनिकांनी मे महिन्यापासून सातत्याने घुसखोरी केल्याचे संरक्षण खात्याने मान्य केले आहे. याबाबतचे काही दस्तावेज या खात्याच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले होते. मात्र, काही तासांनंतर ते तेथून डिलिट करण्यात आले आहेत. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

संरक्षण खात्याच्या या दस्तावेजानुसार गलवान खोर्‍यातून  पँगाँग त्सो, गोगरा हॉट स्प्रिंग्ज येथून चीनने मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केल्याचे दिसते. 17 आणि 18 मे रोजी चीनने लडाखमधील  कुंगरांग नाला, गोगरा आणि पँगाँग सरोवराच्या उत्तर किनार्‍यावरून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. पाच मेनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने आक्रमकपणे आगेकूच केली होती, असेही संरक्षण खात्याने मान्य केले आहे. या घुसखोरीनंतरच पाच आणि सहा मे रोजी पँगाँगमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यांत मोठी चकमक उडाली होती.

दरम्यान, संरक्षण खात्याने वेबसाईटवर अपलोड केलेली ही माहिती आणि दस्तावेज काही तासांतच काढून टाकले आहेत. त्याबाबत काहीही माहिती देण्यास संरक्षण खात्याच्या सूत्रांनी नकार दिला.
राहुल गांधींच्या टीकेनंतर मजकूर डिलिट संरक्षण खात्याने वेबसाईटवर अपलोड केलेल्या माहितीची संदभर्र् देत खा. राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे सत्य आपण देशातील जनतेपासून का लपविले, असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या या ट्विटनंतरच संरक्षण खात्याच्या वेबसाईटवरील मजकूर तातडीने डिलिट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 
 

 "