Wed, Jun 03, 2020 18:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत बँकॉकप्रमाणे मत्स्यालय उभे करा!

मुंबईत बँकॉकप्रमाणे मत्स्यालय उभे करा!

Last Updated: Dec 03 2019 1:16AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बँकॉक येथील सिम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर मुंबईतही जागतिक दर्जाचे भव्य मत्स्यालय तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तातील पाणी शुद्धीकरणासाठीही उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाला दिले.    

मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराकडे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला नवनवीन पर्यटनस्थळे विकसित करावी लागतील. मुंबईतील क्रुझ टर्मिनलवर देश-विदेशातील क्रुझ मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यातील पर्यटकांसाठी आता वेगळा पर्यटन कार्यक्रम आपल्याला द्यावा लागेल, असे ते म्हणाले.

शहरातील कान्हेरी गुंफा, जोगेश्वरी गुंफा, एलिफंटा लेणी आदींच्या क्षेत्राचा विकास करण्यात यावा. मादाम तुसा संग्रहालयाच्या धर्तीवर शहरात एखादे संग्रहालय सुरु करण्यात यावे. पण त्यात वेगवेगळे पुतळे ठेवण्यापेक्षा एखादी संकल्पना निश्चित करुन थीम बेस्ड संग्रहालय उभारण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सिंधुदुर्गमधील सबमरीन पर्यटन प्रकल्पाचाही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. सिंधुदुर्ग विमानतळ आणि या प्रकल्पाला दर्जेदार रस्त्यांची जोड देण्यात यावी. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जा राखून या प्रकल्पाचा विकास करण्यात यावा. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या बुलडाण्यातील लोणार सरोवरातील नाल्याचे पाणी बंद करुन त्याची स्वच्छता राखण्यात यावी. या सरोवराच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले. रायगड विकास प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या 606 कोटी रुपये रकमेच्या रायगड विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. यातून रायगड आणि परिसरात काय काय केले जाणार आहे याचे सादरीकरण करण्यात यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.