Tue, Jun 15, 2021 13:38




मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

Last Updated: May 11 2021 8:57PM





मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिष्टमंडळासमवेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली व मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने पाऊले उचलण्याबाबत राष्ट्रपतींना विनंती करणारे पत्र दिले. या शिष्टमंडळात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, नाना पटोले यांचा समावेश होता.

या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणसंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आता केंद्र सरकारने यात लक्ष घालून लवकरात लवकर पाऊले उचलावीत अशी विनंती राष्ट्रपतींना करणारे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. लवकरच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेऊन त्यांना या प्रश्नी भेटणार आहोत.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आम्ही सर्वांनी समाजाच्या भावना लक्षात घेत केंद्राला याबाबत विनंती करायचे ठरविले आणि त्यानुसार आज राज्यपालांना भेटून पहिले पाऊल टाकले आहे. मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहे. आरक्षण प्रश्नी सरकार सोबत आहे याची समाजाला कल्पना आहे, ते सरकारच्या विरोधात नाहीत, त्यामुळे मी पूर्वी देखील मराठा समाजाला धन्यवाद दिले आहेत आणि आता आपल्या माध्यमातून परत धन्यवाद देतो.

मराठा आरक्षणाचा कायदा विधिमंडळात सर्व पक्षांनी एकमुखाने संमत केला आहे, जनतेच्या भावनांचा आदर ठेवून हा निर्णय  झाला, तो न्यायालयात टिकला नसला तरी सरकार म्हणून आम्ही सर्व या समाजाच्या भावनांशी सहमत आहोत. न्यायालयाने याबाबतीत केंद्राला अधिकार आहेत असे सांगितले आहे, त्या अनुषंगाने आज आम्ही राज्यपाल महोदय यांना भेटलो. राज्यपालांनी देखील आमचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले असून ते केंद्राला आमच्या भावना कळवतील. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.