Sun, Feb 28, 2021 06:44




मुख्यमंत्र्यांचे पोहरादेवी येथील गर्दीबाबत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश

Last Updated: Feb 23 2021 7:08PM





मुंबई : पुढारी ऑनलाईन 

वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या स्वागताला आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप होत होते. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत त्यांनी मौन बाळगले होते. पण, आज त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करुन आपले म्हणणे मांडले.  

आज राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे एका बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले.

वाचा : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण : मंत्री राठोडांच्या शक्तीप्रदर्शनात नियमांचा उडाला फज्जा


मुख्यमंत्री यावेळी म्हणाले,‘गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलिस  तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्त्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे.’

वाचा : पोहरादेवी येथे पोलिसांचा लाठीचार्ज      

ते पुढे म्हणाले,‘मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे. पोहरादेवी येथे झालेली गर्दी चिंताजनक आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून तत्काळ अहवाल द्यावा. ’ 

वाचा : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अखेर संजय राठोडांनी सोडले मौन, म्हणाले...