Tue, Oct 20, 2020 12:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २११ दिवसानंतर मेट्रो १ रुळावर

२११ दिवसानंतर मेट्रो १ रुळावर

Last Updated: Oct 18 2020 1:14AM
मुंबई  : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉकची घोषणा करताना मेट्रो वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे तब्बल दोनशे अकरा दिवसानंतर वर्सोवा ते घाटकोपर मार्गावरील मेट्रो सेवा सोमवारपासून सामान्यांसाठी सुरू होत आहे. तूर्तास 50% फेर्‍या दररोज सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ या काळात चालवल्या जाणार असून, सामान्य नागरिकांनाही मेट्रोतून प्रवास करता येईल. 

22 मार्च ते 18 ऑक्टोबर या दरम्यान तब्बल 211 दिवस मेट्रो सेवा बंद होती. आता सोमवारी सकाळी 8:30 वाजता वर्सोवा स्थानकातून पहिली मेट्रो घाटकोपरसाठी सुटणार असल्याचे मेट्रो प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. शिवाय रात्री 8:30 वाजता शेवटची मेट्रो सुटेल. फेर्‍या मात्र सध्या कमी करण्यात आल्या आहेत. साधारणपणे सुरुवातीला 200 फेर्‍या चालवण्याची तयारी केली असून प्रवाशांची संख्या पाहून फेर्‍या वाढवल्या जातील. 

मेट्रोच्या प्रत्येक स्थानकावर प्रवेशमार्ग व बाहेर पडण्याचे मार्ग यावर मर्यादा घालण्यात आली आहे. शिवाय प्रवाशांना स्थानकात प्रवेश करताना तापमान तपासणी करूनच प्रवेश दिला जाईल. संपूर्ण प्रवासात मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.

प्रत्येक डब्यात तापमान 25-27 अंश इतके राखण्यावर भर दिला जाणार आहे. चढताना किंवा उतरताना गर्दी होऊ नये तसेच नैसर्गिक हवा डब्यात यावी यासाठी प्रत्येक स्थानकावर मेट्रो चे दरवाजे पूर्वीपेक्षा 20 ते 30 सेकंद उशिराने बंद केले जातील. 

कोरोना रोखण्यासाठी तिकीट खिडकीवर कोणतेही प्लास्टिकचे टोकन दिले जाणार नाहीत. त्याऐवजी प्रवाशांना डिजिटल तिकीट, स्मार्ट कार्ड किंवा पेपर क्यूआर कोड तिकीट वापरावे लागेल. एक सीटनंतर दुसर्‍या सीटवर क्रॉस केले असून ते सीट रिकामे ठेवावे लागणार आहे. सोबतच उभे राहून प्रवास करणार्‍या प्रवाशांनादेखील ठराविक अंतरावर केलेल्या खुणांवरच उभे राहून प्रवास करावा लागेल. 

 "