Wed, Aug 12, 2020 03:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डॉ. बाबासाहेबांचे बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार

डॉ. बाबासाहेबांचे बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार

Last Updated: Dec 07 2019 2:17AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परळीच्या बीआयटी चाळीला भेट दिलीमुंबई : प्रतिनिधी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज (ता.6) सकाळी चैत्यभूमीवर येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. यानंतर त्यांनी परळीच्या बीआयटी चाळ इमारतीत दुसर्‍या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी राहायचे तेथे ही भेट दिली. या चाळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे २२ वर्षे वास्तव्यास होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान देखील राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी घोषणा केली. आजवरच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी बीआयटी चाळींची पाहणी केली नव्हती.

दरम्यान, चैत्यभूमीवर आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, महापौर किशोरी पेडणेकर आदींची उपस्थिती होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६३ वा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर दाखल झाले.  

मुंबईतील शिवाजी पार्क, चैत्यभूमी, राजगृह, हिंदू कॉलनी, दादर रेल्वे स्टेशन, कुर्ला एलटीटी स्थानक, डॉ. आंबेडकर महाविद्यालय याठिकाणी अनुयायींना नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.