Thu, Jul 09, 2020 22:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

Last Updated: May 20 2020 6:58PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजीत पवारमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेणार आहेत. राज्यावर कोरोनाचे संकट असताना कृषी उत्पादन वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी २०२० हे वर्ष कृषी उत्पादकता वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 

राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी जिल्ह्यांचे दौरे सुरू केले असून त्यांनी बुधवारी नाशिक आणि ठाणे येथे बैठक घेऊन खरिपाचा आढावा घेतला. गुरुवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन राज्याचा आढावा घेणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. ही अर्थव्यवस्था रुळावर येण्यास वेळ लागणार आहे. मात्र यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे कृषी उत्पादन वाढविण्याची संधी राज्याला आहे. खरिपाची पेरणी आता जवळ आली असून कोरोना संकटात शेतकऱ्यांना बी बियाणे, खते आणि पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. 

लॉकडाऊन काळात कृषिमंत्री दादा भुसे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कृषी सचिव, आयुक्त तसेच क्षेत्रिय कृषी अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधत माहिती घेतली आहे. ३० एप्रिलपूर्वी प्रत्येक जिल्ह्याच्या खरिपाच्या नियोजनाला पालकमंत्र्यांकडून मान्यता घेण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले होते. गुरूवारी होणाऱ्या राज्यस्तरीय खरीपाच्या आढावा बैठकीत राज्याच्या नियोजनाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मान्यता देतील. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना बांधावर खते, बियाणे देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.