Mon, Sep 21, 2020 11:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छोटा शकीलच्या मृत्यूची अंडरवर्ल्डमध्ये चर्चा

छोटा शकीलच्या मृत्यूची अंडरवर्ल्डमध्ये चर्चा

Published On: Dec 21 2017 2:10AM | Last Updated: Dec 21 2017 2:09AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

कुख्यात मोस्टवॉन्टेड डॉन दाऊद इब्राहीम याचा खास हस्तक मोहम्मद शकील बाबू मियान शेख उर्फ छोटा शकील (57) याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने अंडरवर्ल्ड जगतामध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच शकील हा दाऊदपासून वेगळा झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर त्याच्या मृत्यूची बातमी आल्याने अफवांचा बाजार गरम झाला आहे. मात्र, ही शुद्ध अफवा असल्याचा निर्वाळा ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी दिला आहे. 

छोटा शकील हा त्याची दुसरी बायको आयेशा हिच्यासोबत कराचीतील डीएचए कॉलनीमध्ये असलेल्या क्रमांक डी 48 मध्ये वास्तव्य करत होता. 6 जानेवारीला इस्लामाबादमध्ये काही साथीदारांची बैठक घेण्यासाठी गेला असताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तात्काळ त्याला रावळपिंडीतील  कंबाईन वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अशी एक माहिती समोर येते आहे.

दुसर्‍या माहितीनुसार, छोटा शकीलसोबत संबंध ठेवणे जड जाऊ लागल्याने आयएसआयने त्याला ठार केले. दोन दिवस त्याचा मृतदेह शवागरामध्ये ठेवल्यानंतर विमानाने कराची येथे नेण्यात आला आणि तेथेच त्याचा दफनविधी पार पडला. दफनविधीनंतर त्याची दुसरी बायको आयेशा आणि कुटुंबातील इतर सदस्यांना अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे.

शकीलच्या खास साथिदाराचे त्याच्यानातेवाईकांसोबत बोलणे होत असलेले एक रेकॉर्डींग हाती लागल्याचा दावा करण्यात येत असून यातून शकीलच्या मृत्यूचे वृत्त बाहेर आले आहे. 
छोटा शकीलने आपल्यासारखाच दिसणारा कराचीमधील रहीम मर्चंट उर्फ डोगला याला आपल्यासारखे बोलणे, वागणे आणि वावरण्याचे प्रशिक्षण दिले होते. गेल्या दोन दशकापासून डोगलाच सर्व हस्तकांशी आणि प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होता. आयएसआयच्या मदतीनेच शकील सर्व शस्त्रास्त्रांचे व्यवहार करत होता. शकीलच्या जाण्याने दाऊदला हादरा बसला आहे. जानेवारी महिन्यात त्याला उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

शकीलचा हस्तक बिलाल, मोहम्मद राशीद, इक्बाल सलीम, युसूफ राजा आणि परवेश खवजा याच्यासह पाकिस्तानातील साथिदार डी कंपनीपासून वेगळे झाले आहे. त्यामुळे भारतामध्ये परतण्याचा दाऊदने मन बनविल्याचीही माहिती समोर येत आहे. छोटा शकीलच्या मृत्यूच्या बातमीला आयएसआय किंवा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दुजोरा दिला नसल्याने वेगवेगळ्या चर्चांंंना उधाण आले आहे.

दाऊदचा भाऊ अनिस इब्राहीमसोबत असलेले वाद आणि त्याचा टोळीमध्ये वाढलेला हस्तक्षेप यामुळे शकील हा दाऊदपासून वेगळा झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. शकील वेगळा होऊन पाकिस्तानाच दुसर्‍या ठिकाणी राहात आहे. तसेच त्याने पाकिस्तान सोडून अन्य देशात बस्तान थाटल्याचीही माहिती समोर येत आहे. या माहितीमुळेच शकीलचा शोध घेण्यासाठी त्याच्या मृत्यूची बातमी पसरवली जात असल्याचेही बोलले जाते.