स्वतंत्र लढले असते, तर राष्ट्रवादीला वीसच जागा

Last Updated: Jul 14 2020 9:29AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना सोबत नसती, तर भाजपच्या 50 जागाच निवडून आल्या असत्या, असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढले असते, तर राष्ट्रवादीला 20 व काँग्रेसला फक्त 10 जागा मिळाल्या असत्या, असा टोला सोमवारी लगावला. पुन्हा निवडणूक होतील तेव्हा स्वतंत्र लढा, तुम्हाला कोणाची किती ताकद आहे ते कळेल, असे आव्हानही त्यांनी दिले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत भाजपच्या 105 जागांवरून टीका केली होती. शिवसेना सोबत नसती, तर भाजपच्या 50 जागाच निवडून आल्या असत्या, असे पवार म्हणाले होते. शरद पवार यांनी केलेल्या या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

ते म्हणाले की,  शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असे सांगून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या आमदार, कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच प्रशासनालाही सरकार 5 वर्षे टिकणार आहे, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत सरकार पाडून दाखवा, असे म्हणत आहेत; पण सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. तुम्ही वेगळे लढला असता, तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागाच निवडून आल्या असत्या.