होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गाडीत अडकलात तर अशी 'घ्या' काळजी!

गाडीत अडकलात तर अशी 'घ्या' काळजी!

Last Updated: Jun 03 2020 8:55AM

संग्रहित छायाचित्रमुबंई : पुढारी वृत्तसेवा 

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज 'निसर्ग' चक्रीवादळ मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली असून सध्या मुंबईतील काही भागात पाऊस सुरू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. गरज असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन महापालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आले आहे. त्याच बरोबर कार किंवा जीप ची 'विंडो' काच फोडता येईल असे साधन गाडीमध्ये सहज हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवावे अशी सुचना ही देण्यात आल्या आहेत. 

मे मध्ये रोज 32 मुंबईकर ठरले कोरोना बळी

२००५ साली झालेल्या अतिवृष्टी दरम्यान २६ जुलैला काही चार चाकी वाहनांच्या स्वयंचलित लॉक सिस्टिममध्ये पाणी गेल्यामुळे सदर यंत्रणा बंद पडली होती. परिणामी गाडीचे दरवाजे व खिडक्या उघडता न आल्याने काही नागरिकांचे दुर्दैवी मृत्यू झाले होते. अशीच एक दुर्दैवी घटना गेल्या वर्षी २०१९ च्या पावसात देखील घडली होती, ज्यात दोन व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू झाले होते.

ही बाब लक्षात घेऊन व अशी घटना टाळता यावी, यासाठी काही अत्यंत महत्वाच्या कारणासाठी चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून आपल्या वाहनात काच फोडता येईल, असे हातोडा, स्टेपनी पान्हा यासारखे एखादे साधन ठेवण्याची सूचना महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. तसेच हे साधन गाडीच्या डिकीत न ठेवता गाडी चालकाला सहजपणे हाताला लागेल अशाप्रकारे ठेवावे; असेही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे आवर्जून कळविण्यात येत आहे.