Fri, Sep 25, 2020 15:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळ विस्तार आता नागपुरातच

मंत्रिमंडळ विस्तार आता नागपुरातच

Last Updated: Dec 09 2019 1:20AM
मुंबई : उदय तानपाठक

राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार आता नागपुरात होण्याची शक्यता असून, अधिवेशन काळातच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे समजते. दरम्यान, काँगेे्रस आणि राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याने मंत्रिमंडळाचे रखडलेले खातेवाटप अजून किमान दोन दिवस तरी होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन नऊ दिवस झाले, त्यांच्यासह सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी, काँगेे्रस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा यात समावेश आहे. मात्र, हे मंत्री अजूनही बिनखात्याचे आहेत. 

गृह, महसूलवर वाद

राष्ट्रवादी आणि काँगेे्रस यांच्यातील खात्यांची रस्सीखेच अजून संपलेली नसल्याने हा विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. गृह आणि महसूल या खात्यांवरून मुख्यतः वाद असून, नगरविकास मात्र शिवसेनेकडेच राहील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ सामान्य प्रशासन खाते स्वतःकडे ठेवतील. गृह खाते त्यांनी सांभाळावे, असा आग्रह शिवसेनेतूनच होत असला, तरी उद्धव ठाकरे त्यासाठी तयार नाहीत. नगरविकास खाते सुभाष देसाई यांच्याकडे तर एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक आरोग्यासह आणखी एक महत्त्वाचे खाते दिले जाईल. 

पवारांचे वजन कोणाच्या पारड्यात?

उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत जयंत पाटील आणि अजित पवार हे दोन दावेदार असले, तरी शरद पवार हे आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकणार, याबद्दल उत्सुकता आहे.   

इच्छुकांची भाऊगर्दी

मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झाला नसला, तरी पक्षांचे खातेवाटप करावे आणि त्या-त्या पक्षांच्या मंत्र्यांकडे विस्तार होईपर्यंत ती खाती द्यावीत, असा आग्रह राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांकडून सुरू आहे. विस्तार रखडण्याचे कारण विशेषतः राष्ट्रवादी आणि काँगेे्रसमधील इच्छुकांची भाऊगर्दी हे आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी 17 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे संकेत मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी पुण्यात दिले.

 "