Wed, Sep 23, 2020 02:49



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट लवकरच सुरू होणार

राज्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट लवकरच सुरू होणार

Last Updated: Jul 05 2020 5:58PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मुंबई : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊनमुळे बंद असलेली राज्यातील हॉटेल्स पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. मात्र, हॉटेलांत येणार्‍या ग्राहकांची वैद्यकीय चाचणी करण्याची जबाबदारी हॉटेलचालकांवर राहील. त्याशिवाय नवी नियमावलीही तयार केली जात असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टोंरंट असोशिएशनच्या पदाधिकार्‍यांसोबत मुख्यमंत्र्यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.  ते म्हणाले, की महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे असलेले मोठे स्थान लक्षात घेऊन हा उद्योग परत सुरू करावा लागणार आहे. त्यासाठी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली आहे.  त्यानंतर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह हे या चर्चेत सहभागी झाले होते.

हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचार्‍यांना कामावरून कमी करू नये, असे आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले की हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवासी निरोगी असेल याची खात्री करून घेण्यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. एक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आली  तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात.

राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नियमांचे पालन केल्यास हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास अडचण येणार नाहीत. हॉटेल्समध्ये असलेले स्थानिक कामगार, कर्मचार्‍यांना काढू नका. यात काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.  पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, की पर्यटन व्यवसाय राज्याच्या विकासाला प्रोत्साहन देऊ शकतो, याच विचाराने सरकारने नाईट लाईफला प्रोत्साहन दिले.

मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या शहरांत सगळे व्यवहार सुरु करतांना भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यासाठी हॉटेल्सनी वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांना खूप मदत केली आहे. कोरोनानंतर हा उद्योग पुन्हा जोमाने स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र आता या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी नियम घालणे महत्वाचे आहे. मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले की, सर्व हॉटेल्स 100 टक्के लगेच सुरु करता येणार नाही पण टप्प्याटप्प्याने, सर्व काळजी घेऊन सुरू करण्याचे नियोजन  आहे.

हॉटेल्स सुरु करतांना काटेकोर नियमांची आखणी करावी लागेल. हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधांचा वापर निवास, जेवण्याखाण्यासाठी केला जातो त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक ठिकाणी सरकारला या नियमांची पूर्तता होते किंवा नाही हे पाहणे शक्य होणार नाही यासाठी स्वयंशिस्त ठेवणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता म्हणाले. 





 







"