Thu, Jul 09, 2020 23:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रक्‍ताचा तुटवडा भासणार नाही ः मंत्री डॉ. शिंगणे

रक्‍ताचा तुटवडा भासणार नाही ः मंत्री डॉ. शिंगणे

Last Updated: Apr 07 2020 10:57PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील जनतेला दैनंदिन गरजेचे अत्यावश्यक सामान, औषधे, सॅनिटायझर, मास्क आदी बाजारात उपलब्ध होतील. या वस्तूंचा काळाबाजार होणार नाही व मालाचा दर्जा राखूनच उत्पादन होईल. तसेच, लॉकडाऊनच्या कालावधीत थॅलेसेमिया रुग्ण आणि कर्करुग्णांना रक्‍ताचा तुटवडा होणार नाही, अशी ग्वाही अन्‍न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

शिंगणे म्हणाले की, जनतेला त्यांच्या तक्रारी प्रशासनाकडे तत्काळ नोंदविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन 25 मार्चपासून प्रशासनाच्या मुख्यालयात 24 बाय 7 तास कंट्रोल रूम नियंत्रण कक्ष तयार केले आहे. तसेच टोल फ्री क्रमांक 1800222365 वर तक्रार नोंदविण्याची व्यवस्था केली आहे.

औषध प्रसाशन विभागाने 24 मार्च रोजी रक्‍तपेढींच्या प्रतिनिधींची, तज्ज्ञांची, बीटीओ व प्रशासनाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप तयार केला. या ग्रुपवर राज्यातील प्रत्येक रक्‍तपेढीने त्यांच्याकडील रक्‍ताच्या उपलब्धतेबाबतची माहिती संकलित करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत रक्‍ताचा तुटवडा होणार नाही, यासाठी गरजेनुसार रक्‍तदान शिबिरे आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत, असे शिंगणे म्हणाले. रक्‍तपेढ्यांकडे 20 दिवस रक्‍तपुरवठा करता येईल इतका साठा उपलब्ध आहे.