Wed, Aug 12, 2020 20:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्लॉग: घरगडी घेता का घरगडी ?

ब्लॉग: घरगडी घेता का घरगडी ?

Published On: May 22 2018 10:34AM | Last Updated: May 22 2018 10:34AMदत्तकुमार खंडागळे

राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी "हमीभाव मागण्या ऐवजी मार्केटींग करा !" असा अनाहूत सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. असा सल्ला देत त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. सत्तेत गेल्यावर एखाद्या माणसाचे किती अध:पतन होवू शकते ? याचा उत्तम नमुना म्हणजे सदाशिव खोत आहेत. 

शेतकऱ्यांच्या जीवावर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सदाशिव खोत मंत्री पदावर पोहोचले आहेत. त्याच शेतकऱ्यांच्या खाल्लेल्या थाळीत सदाशिवराव कार्यक्रम उरकायला लागलेले दिसत आहेत. याला खाल्ल्या ताटात घाण करणे म्हणतात. हमी भाव आणि दर मागत मागतच सदाशिव खोत मंत्रीपदापर्यंत पोहोचले. मग आजच त्यांना ही उपरती का सुचली आहे ? शेतकऱ्यांनी मार्केटींग करावे, रामदेव बाबा त्याचा माल विकतो मग शेतकऱ्यांचा विकत नाही. शेतकऱ्यांनीही मार्केटींगच करावे वगैरे वगैरे अकलेचे तारे खोतांनी तोडले आहेत. आधीच मर्कट, त्यात पिले दारू मग त्याच्या हाती कोलित सापडल्यावर काय होते ? तसा प्रकार सध्या खोतांचा झाला आहे. त्यांना आपण काय बोलतो आहोत, कुणाला काय सांगतो आहोत ? आपल्याकडे कुठले पद आहे ? याचे भान त्यांना राहिलेले नाही. खुप दिवस एखाद्याचे लग्न ठरत नसते अन ते अचानक ठरल्यावर त्याला जसा हर्षवायू होतो अन त्याची मती भ्रष्ट होते तसा काहीसा प्रकार खोतांच्या बाबतीत घडला आहे की काय ? अशी शंका येवू लागली आहे. कल्पनेत नसताना मंत्रीपद पदरात पडल्याने त्यांचा विवेक, शहाणपणा मेला आहे की काय ? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. 

शेतकऱ्यांची अन रामदेव बाबाची तुलना करताना खोतांची अक्कल चालत नव्हती की काय ? या दोघात  तुलनाच कशी होवू शकते ? रामदेव बाबाकडे योगातून उभारलेले प्रचंड भांडवल आहे, स्वत:ची भक्त नावाची भली मोठी बाजारपेठ हातात आहे. शिवाय सरकारच्या पायघड्या आहेत. स्वत:च्या वस्तूचे दर ठरवण्याचा अधिकार आहे. मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या लाभार्थ्यांच्या यादीत रामदेव बाबाचे नाव घ्यावे लागेल. असे असताना खोत शेतकरी व रामदेव बाबाची व शेतकऱ्यांची तुलनाच कशी करतात ? रामदेव बाबा जर निव्वळ शेती करत असते तर कधीच आत्महत्या करते झाले असते. आंदोलनात पाचव्या दिवशी स्ट्रेचरवरून न्यावं लागलेल्या रामदेव बाबांना शेतकऱ्यांसारखा संघर्ष, गळचेपी सहन करणे शक्य नाही. याची कल्पना सदाशिव खोतांना आज तरी येणार नाही. कारण त्यांचे बुड मंत्रीपदाच्या उबदार हवेने गरम झाले आहे. गरम झालेल्या बुडाला वास्तवाचे भान राहिले नाही. बापजाद्यांपासून संघाच्या शाखेवर जावूनच मंत्रीपदाचा शिदा पदरात पडल्याच्या भ्रमात खोतांनी राहू नये. सदाशिव खोतांच्या अंगावर मंत्रीपदाची जी झुल आहे ती केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या जीवावर आहे. याचे भान त्यांनी ठेवावे.

खोतांना मंत्रीपद मिळाले ते शेतकऱ्यांच्या जीवावर. पण सत्ता मिळाल्यापासून त्यांनी फडणवीसांची गुलामी चालवली आहे. उठता-बसता ते "फडणवीस चालिसा" म्हणताना दिसत आहेत. मला भाजपने मंत्री केले, मला फडणवीस साहेबांनी असे केले, तसे केले असा स्तुती पाठचा एक कलमी कार्यक्रम चालू असतो. मंत्रीपद मिळाल्यापासून सदाशिवराव बाराच्या भावात आहेत. या गाव गाड्यातल्या गड्यावर लिहावे वाटत नाही पण ते असे काही रंग उधळताहेत की नाईलाज होतो. इच्छा नसताना लिहावे लागते. 

गतवर्षी शेतकऱ्यांचे आंदोलन राज्यभर पेटले होते. कर्जमाफीची मागणी घेवून शेतकरी रस्त्यावर उतरला होता. शेतकऱ्यांचे आंदोलन राज्यभर तीव्र झाले होते. सदाशिव खोत कृषी राज्यमंत्री व पांडूरंग फुंडकर कॅबिनेट मंत्री आहेत. पण तरीही सदाशिव खोत आपणच मुख्यमंत्री असल्याच्या थाटात शेतकऱ्यांच्या भावना दुखावत होते. या सर्व काळात पांडूरंग फुंडकर "ब्र" शब्द बोलत नव्हते. चालबाज फडणवीसांनी शेतकऱ्यांच्यातील रांगडा गडीच शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढावयास पुढे केला होता. बिभिषणाला  फितूर करूनच रामाने रावण मारला. त्या पध्दतीने सरकार खोतांना फितूर करूनच शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढू पहात होते. काश्मिरमध्ये लष्करावर स्थानिक नागरिक दगड मारत होते. लष्काराने अखेर  एका स्थानिकाला लष्करांच्या जीपवर बांधले अन दगडफेकी पासून सुटका केली. फडणवीस सरकारने नेमकी तशीच पध्दत वापरली. शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले असताना शेतकऱ्यांच्या समोर हा मंत्रीपदाने हुराळलेला पोपट सोडला. लष्कराने जसा स्थानिक तरूण गाडीवर बांधला होता तसेच फडणवीसांनी खोतांना बचावासाठी पुढे केले. सदाशिव खोतही आपणच सरकार असल्याच्या थाटात गपड्या हाणत होते. त्यांनी त्यावेळी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या.

सदाशिव खोत शेतकऱ्यांचेच नेते. सत्तेत जाण्यापुर्वी ते शेतकऱ्यांचेच प्रश्न घेवून सरकारशी दोन हात करत होते. शेतकऱ्यांच्या मालाला दर, हमीभाव व कर्जमाफी या मुद्यावर सदाशिव खोतांनी कैक सभा गाजवल्या. ते शेतकऱ्यांच्या गळ्यातले ताईत बनले. पण सत्तेत जाताच त्यांची मती भ्रष्ट झाली. ते फडणवीसांनी दाखवलेल्या गोमट्या मांडीला भुलले. सत्तेच्या हाडकासाठी त्यांनी माय-बापाशीच प्रतारणा चालवली आहे. मुख्यमंत्री फडणवीस, कृषी खात्याचे कॅबिनेट मंत्री पांडूरंग फुंडकर बाजूलाच होते. पण हेच महाशय गुडघ्यावर आले होते. मंत्रीपद आपल्या सोबत अखेर पर्यंत जाणार असल्याचे सदाशिव खोतांना वाटते आहे की काय? सरकारला पाच वर्षे पुर्ण झाली की सदाशिवरावांच्या अंगावरील मंत्रीपदाची झुल उतरवली जाणार आहे. ही झुल कर्णाच्या कवचकुंलासारखी नाही. कर्णाची सुध्दा कवचकुंडले उतरवली होती. याची जाणीव खोतांनी ठेवावी. भाजपाला सत्तेपर्यंत घेवून जाणाऱ्या गोपिनाथ मुंडेंची अवस्था "ना घर का ना घाटका" अशी झाली होती. आताही एकनाथ खडसेंची तीच तर्हा आहे. मग हे कोण टिकोजीराव लागून गेले ? सदाशिव खोत असेच बरळत राहिले तर मंत्रीपदाची झुलच नव्हे तर शेतकरी त्यांची कपडे उतरवल्या शिवाय राहणार नाही. याचे भान त्यांनी जरूर ठेवायला हवे.

मार्केटींगचा शौक इतकाच असेल तर त्यांनी मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा अन रामदेव बाबाच्या कंपनीत मार्केटींग मॅनेंजर म्हणून कामाला लागावे. सरकार गेल्या नंतर खोत फारसे उपयोगाचे राहणार नाहीत. त्यांचा सरकारच्या व शेतकऱ्यांच्या दृष्टीने असणारा उपयोग संपलाय. त्यामुळे फडणवीसही खोतांचे मार्केटींग करतील. "घरगडी घेता का घरगडी ?" असे खोतांचे मार्केटींग फडणवीसांनी केले तर नवल वाटणार नाही.