होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिहारमधील तिहेरी खून प्रकरण; आरोपीस ठाण्यात अटक

बिहारमधील तिहेरी खून प्रकरण; आरोपीस ठाण्यात अटक

Published On: Jan 05 2018 2:01AM | Last Updated: Jan 05 2018 2:01AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

बिहारमध्ये तिहेरी खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला परजितकुमार सिंग (39) हा आरोपी बक्सर सेंट्रल जेल, जिल्हा चंपारन्य (बिहार) येथून आपल्या चार साथीदारांसह वर्षभरापूर्वी फरार झाला होता. त्या आरोपीस ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ठाण्यात गुरुवारी अटक केली. अटक केलेल्या आरोपीस बिहार पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली.

बिहारमधील टाऊन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी दोन महिला आणि एका पुरुषाची हत्या आरोपी परजितकुमार यानेएप्रिल 1998 साली केली होती. या गुन्ह्यात आरोपी परजितकुमार यास फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. अखेर आरोपीनेराष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर केल्यानंतर त्याची फाशीची शिक्षा रद्द होवून जन्मठेपेची शिक्षा झाली होती. याच दरम्यान आरोपी परजितकुमार हा बक्सर सेंट्रल जेल येथे शिक्षा भोगत असताना 3 डिसेंबर 2016 रोजी आपल्या चार साथीदारांसह जेलमधून फरार झाला होता. त्यानंतर तो बिहार राज्यातील
अनेक लोकांना खंडणीसाठी धमकवत होता.

याप्रकरणी बेथिया जिल्हा पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होती. दरम्यान फरार आरोपी परजितकुमार हा ठाणे परिसरात असल्याची माहिती बेथिया जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक विनय कुमार यांनी ठाणे गुन्हे शाखेला दिली होती. त्या माहिती नुसार ठाणे गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व त्यांचे पथक मागील तीन महिन्यांपासून आरोपीच्या मागावर होते.

दरम्यान आरोपी परजितकुमार हा सिडको बस स्टॅण्ड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री 1 च्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने परजितकुमारला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपण अन्य तीन आरोपींच्या मदतीने धोतराचा दोर बनवून त्या आधारे जेलमधून फरार झालो होतो अशी कबुली दिली. जेलमधून फरार झाल्यानंतर तो नेपाळमध्ये पळून गेला होता. त्यानंतर कलकत्ता, दिल्ली, गुजरात, नाशिक, मुंबईआणि ठाण्यात लपून बसत तो बिहारमध्येखंडणीसाठी काही लोकांना धमकवत होता.ही कामगिरी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व त्यांच्या पथकाने केली.