होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडेंना बाजूला करत भाजपने विधानपरिषदेला दिली 'यांना' संधी!

एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडेंना बाजूला करत भाजपने विधानपरिषदेला दिली 'यांना' संधी!

Last Updated: May 08 2020 1:31PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

येत्या २१ मे रोजी होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपने सर्व ज्येष्ठ उत्सुक नेत्यांना डावलून नवीन चेहरे दिले आहेत. 

माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपकडून उत्सुक असलेल्या पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांना बाजूला ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. 

विजयसिंह मोहित पाटलांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये दाखल झाले होते. धनगर समाजातील मातब्बर नेते असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक भाजपच्या चिन्हावर बारामतीमध्ये अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला होता. तथापि, बारामतीत अजित पवारांकडून त्यांना दणकून पराभवाला सामोरे जावे लागले. 

दुसरीकडे नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडमधील भाजपच्या मेडिकल सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछेडे यांना लॉटरी लागली आहे. चारही नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने  भाजपकडून उत्सुक असलेल्या पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांची पूर्णपणे निराशा झाली आहे. एकनाथ खडसे यांनी जाहीरपणे उमेदवारी देण्याची मागणी केली होती.