Mon, Aug 03, 2020 15:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इंदू मिल स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवण्याचा निर्णय

इंदू मिल स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवण्याचा निर्णय

Last Updated: Jan 16 2020 1:42AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील प्रस्तावित स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी या पुतळ्याची उंची 250 फूट इतकी निश्चित करण्यात आली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा 100 फूट व पुतळा 350 फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट इतकी होणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत स्मारकाच्या सुधारित संकल्पनेचे सादरीकरण सल्लागार शशी प्रभू यांनी केले. या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुधारित संकल्पानुसार सादर केलेल्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा खर्च प्राधिकरणामार्फत  करण्यात येणार असून त्याची प्रतिपूर्तता शासन करणार आहे.

हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी 9 फेब्रुवारी 2018 रोजी कार्यादेश देण्यात आले असून सर्व संरचनात्मक आराखड्यांचे 100 टक्के काम पूर्ण होऊन आवश्यक त्या परवानग्या देखील प्राप्त झाल्या आहेत. पुतळ्याची उंची वाढविण्याच्या निर्णयामुळे आवश्यक त्या परवानग्या तत्काळ घेण्यात याव्यात, असे देखील मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश देण्यात आले.

पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढेल तसेच पुतळ्याच्या पायाची देखील वाढ होईल. या  स्मारकसाठी 700 कोटी रुपए खर्च अपेक्षित होता. आता 1100 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. शापूरजी पालनजी या कंपनीला स्मारक उभारण्याचे काम देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या विविध विभागाच्या परवानग्या येत्या 8 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. दरम्यान, सरकारने घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य असून हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

    स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय.

    पादपीठामध्ये 6.0 मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग.

    स्मारकामध्ये 68 टक्के जागेत खुली हरित जागा.

    400 लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग व कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह.

    1000 लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह.