Thu, Jul 09, 2020 07:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काही पक्षातील नेत्यांच्या हट्टामुळे राष्ट्रपती राजवट; भाजपचे अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर खापर

काही पक्षातील नेत्यांच्या हट्टामुळे राष्ट्रपती राजवट; भाजपचे अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर खापर

Last Updated: Nov 12 2019 9:15PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

काही पक्षातील नेत्यांच्या हट्टामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, असे म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. मुंबई येथे भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रपती राजवटीवरून शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला. 

मुनगंटीवार पुढे म्हनाले की. योग्य वेळ आली की, भाजप आपली भूमिका जाहीर करणार आहे. भाजप अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. राज्यपालांनी आम्हालाही सत्ता स्थापनेसाठी २४ तासांचाच कालावधी दिला. अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, जनहिताचं काम करण्यासाठी सरकार स्थापन होणं गरजेचं होतं. मात्र सर्वात मोठा पक्ष भाजप असताना आणि मतदारांनी तसा जनादेश दिलेला असताना मित्र पक्षाने जनादेशाचा अनादर केला. इतर पर्याय असल्याचं सांगून मित्रपक्षाने राज्यात राष्ट्रपती राजवटीची परिस्थिती ओढवली. काही लोकांनी जो हट्ट केला, त्याचा हा परिणाम आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

राज्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असताना सरकार स्थापन होण्याची गरज होती. मात्र, काही पक्षांच्या नेत्यांकडून जनादेशाचा अपमान केला गेला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी भाजप ठामपणे उभा आहे. मित्रपक्षाच्या हट्टामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली आहे, असे म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर आरोप केला. योग्य वेळ आली की, भाजप आपली भूमिका जाहीर करेल, असेही त्यांनी सांगितले.