Sun, Sep 20, 2020 06:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कशेडी घाटात चाकरमान्यांची बस लुटण्याचा प्रयत्न

कशेडी घाटात चाकरमान्यांची बस लुटण्याचा प्रयत्न

Last Updated: Aug 14 2020 1:11AM
पोलादपूर : प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना घेऊन येणाऱ्या एका खासगी बसला कशेडी घाटात लुटण्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी (दि. १३) पहाटे सुमारे तीनच्या सुमारास कशेडी घाटातील धामणगाव जवळ घडली. ही बस मुंबईहून गुहागरकडे येत होती. काही प्रवाशांच्या सतर्कतेमुळे यावेळी दरोडेखोरांचा प्रयत्न फसला. या घटनेमुळे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास  गुहागरकडे येणाऱ्या एका खासगी बसचा वेग घाटात धामणगावजवळ कमी झाल्यानंतर चालत्या गाडीत चढून बस लुटण्याचा प्रयत्न झाला. मात्र प्रवाशांच्या सतर्कतेमुळे दरोडेखोरांचा हा प्रयत्न फसला. याबाबत पोलादपूर पोलिस स्थानकात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. या प्रकरणी एकास अटक करण्यात यश आले आहे. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कशेडी घाट परिसरात पोलादपूर हद्दीतील धामणदेवी गावाच्या परिसरात रत्नागिरीकडून उस्मानाबादला जाणारे ट्रक महामार्गालगत उभे होते. याचवेळी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरकडे जाणाऱ्या एका खासगी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न काहींनी केला. मात्र, प्रवाशांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. 

या टोळीतीळ ६ फासेपारधीपैकी आरोपी अशोक जाधव (रा. उस्मानाबाद) याला घटनास्थळी दरोडा प्रकरणी पकडण्यात आले आहे. तर अन्य ५ जण फरार आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलादपूर पोलिस ठाण्याचे सपोनि प्रशांत जाधव याच्या समवेत दीपक जाधव, रुपेश पवार, विनोद महाडिक, गणेश किर्वे आदींनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे गतीमान करत महामार्गावर बंदोबस्त ठेवला आहे. 

मुंबई- गोवा महामार्गवरून मोठ्या संख्येने चाकरमानी खासगी बसने व खासगी वाहनाने येत आहेत, त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. कशेडी घाटात पोलिसांनीही लक्ष देण्याची मागणी होत आहे. गेली अनेक वर्षे गणपतीच्या सणाच्या पाश्वभूमीवर जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येते आहे.

 "