होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अशोक चव्हाण काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत

अशोक चव्हाण काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत

Published On: May 25 2019 3:50PM | Last Updated: May 25 2019 3:50PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव झाला. तसेच काँग्रेसला महाराष्ट्रात केवळ एकच जागा मिळाली. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेसच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे. 

नांदेड लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. गेल्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही अशोक चव्हाण येथून निवडून आले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा झटका बसला.

मोदींच्या त्सुनामीनंतर आता काँग्रेसमध्ये राजीनाम्याची लाट आली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एका पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे की, मी काँग्रेसच्या अपयशाची व्यक्तिगत जबाबदारी घेतो. मला कोणावरही दोषारोप करायचे नाहीत. अध्यक्ष या नात्याने माझी राजीनामा देण्याची तयारी आहे. सर्व राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली नाही. त्यासाठी या पराभवाला राहुल गांधी जबाबदार नाहीत. माझ्यासह काँग्रेसचे प्रत्येक राज्यातील प्रदेशाध्यक्ष सामुहिक राजीनामा देणार आहेत. त्यावर निर्णय घेण्याची मोकळीक राहुल यांना असेल.

वंचित बहुजन आघाडीबाबत बोलताना त्यांनी, वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत असती तर चित्र वेगळे असते, असे म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीने आमचे नुकसान केले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक लाख- दीड लाख मते त्यांनी घेतली. वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, असे त्यांनी नमूद केले.

काँग्रेसमध्ये कसलीही धुसफूस नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.