Thu, Jul 09, 2020 06:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोस्ट बँकेच्या एटीएममधून कोणत्याही बँकखातेदाराला मिळणार पैसे!

पोस्ट बँकेच्या एटीएममधून कोणत्याही बँकखातेदाराला मिळणार पैसे!

Last Updated: Nov 10 2019 1:37AM
मुंबई : गणेश शिंदे 

एखाद्या व्यक्‍तीचे बँक खाते कोणत्याही बँकेत असेल तर त्याला भारतीय डाकघर (पोस्ट) मधून दिवसाला दहा हजार रुपये काढता येणार आहेत. याचा फायदा विशेषत: ग्रामीण भागातील खातेदारला होणार आहे. त्याचा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकेत जाण्याचा वेळ वाचणार आहे.

भारतीय डाकघरअंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने (आयपीपीबी) आधार एन्बेल्ड पेमेंट सिस्टीम (एईपीएस) अर्थात आधार एटीएम ही सुविधा सुरू केली आहे. यासाठी कोणतेही शुल्क खातेदारांकडून आकारले जाणार नाही. त्यामुळे ही सुविधा सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरत आहे.

‘आपली बँक, आपल्या दारी’ हे ब्रीद वाक्य व बँकिंग सुविधांपासून वंचित आणि अपूर्ण बँकिंग सुविधा असणार्‍या लोकांपर्यंत सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा पोहोचवणे ही संकल्पना घेऊन आयपीपीबी ही सेवा गतवर्षी एक सप्टेंबर 2018 ला देशात सुरू केली. वित्तीय समादेशन आणि वित्तीय साक्षर हा या मागील उद्देश होता. आता आयपीपीबीने आणखी एक पाऊल टाकत राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकांत असलेल्या खातेदारांसाठी एईपीएस  (आधार एटीएम) ही सुविधा दोन महिन्यांपासून देशातील सर्व पोस्टांत सुरू केली. या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आयपीपीबीने सांगितले.
सध्या महाराष्ट्रात सुमारे 12 हजार पोस्ट कार्यालये (महाराष्ट्र व गोवा मिळून) आहेत. पोस्टात रोज कामानिमित्त येणार्‍या ग्राहकाला आधार एटीएम या सुविधेद्वारे त्याचे कोणत्याही बँकेत खाते असेल तर  त्याला बँकेच्या खात्यातील पैसे पोस्टातच काढता येणार आहेत. दिवसाला दहा हजार रुपये अशी पैसे काढण्याची कमाल मर्यादा आहे. यासाठी आधार नंबर , मोबाईल नंबर त्याला द्यावा लागणार आहे. तसेच बोटाचे ठसे घेतल्यानंतर खातेदाराच्या मोबाईलवर ओटीपी (पिन नंबर) येईल. हा ओटीपी नंबर पोस्टाच्या त्या कर्मचार्‍याला सांगणे, अशी आधार एटीएमची प्रक्रिया आहे. मात्र, खातेदाराला ज्या बँकेतून पैसे काढायचे आहेत, त्या बँकेशी तो आधार नंबरशी जोडला पाहिजे, त्याचा आधार नंबर लिंक गरजेचा आहे.
ग्रामीण डाकसेवकामार्फतही घरपोच सुविधा...
ग्रामीण भागातील बँकेच्या खातेदाराला आधार एटीएमद्वारे घरपोच पैसे मिळणार आहेत. त्यासाठी त्या खातेदाराला 155299 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे. त्यानंतरच ग्रामीण डाकसेवक घरी येऊन सर्व प्रक्रिया पूर्ण करून संबंधिताला पैसे देईल. त्यासाठी ग्रामीण डाकसेवकाला मोबाईल, बायोमेट्रिक, डिव्हाईस कनेक्शन देण्यात आले आहेत.
ग्राहकाचे फायदे

  वेळ व पैसा वाचणार 
 बँकेतील खात्यावरील बॅलन्स विचारता येणार 
 विशेषत: ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना जवळच्या पोस्टातून पैसे मिळण्यास मदत होणार