Tue, Jun 15, 2021 12:03
परमबीरविरुद्ध खंडणीची आणखी एक याचिका 

Last Updated: Jun 11 2021 2:27AM

मुंबई :  पुढारी वृत्तसेवा 

चेंबूर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाबद्दल दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास न करण्यासाठी माजी पोलीस आयुक्‍त परमबीर सिंग यांनी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्यामार्फत 200 कोटींची लाच मागितली होती, असा धक्‍कादायक आरोप करणारी हस्तक्षेप याचिका गुरुवारी उच्च न्यायालयात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. बांधकाम व्यावसायिक कार्तिक भट्ट यांनी दाखल केली आहे.या याचिकेची  न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणी 14 जूनला निश्चित केली. 

परमबीर प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच ही हस्तक्षेप याचिका दाखल झाली. चेंबूर येथील एका झोपडपट्टी पुनर्वसन गृहनिर्माण प्रकल्प सुरू केल्याचे सांगत साडे तीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष मिठबावकर यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात भट विरोधात 2020 मध्ये एफआयआर दाखल केली होती. पोलीसांनी दाखल केलेल्या एफआयआर नुसार तपास न करण्यासाठी चेंबूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून आपल्याकडे 200 कोटी रुपयांची मागणी केली. तसेच सदर गृहनिर्माण प्रकल्पाच्या 425 कोटींच्या उत्पन्नातील 10 टक्क्यांची मागणी केली असल्याचा आरोप  केला आहे. 2018 मध्ये याच गृहनिर्माण प्रकल्पासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांनी परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरूनच आपल्याकडे खंडणी मागितली असल्याचा आरोपही भट यांनी केला आहे. 

परमबीर सिंह यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा आणि पराग मणेरे यांच्यासमवेत अनेक व्यावसायिकांकडून अशाच प्रकारे खंडणी गोळा केली, असा आरोपही भट यांनी हस्तक्षेप अर्जातून केला आहे. न्यायमूर्ती  एस. एस. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुरूवारी वेळे अभावी या याचिचकेवर सुनावणी होऊन शकली नाही. त्यामुळे याचिकेची सुनावणी 14 जून रोजी निश्चित करण्यात आली. 
चेबुर येथील झोपडपट्टी पुनर्वसन गृहनिर्माण प्रकल्पाचा दिपक निकाळजे आणि बांधकाम व्यवसायीक कार्तीक भट्ट यांच्याशी प्राथमिक व्यवहार झाला.त्यानंतर भट्ट यांनी या प्रकल्पात संतोष मिठबाकर यांना भागिदारी देतो म्हणून सांगून सुमारे  350 कोटी घेतले.हे फैसे घेऊन भट्ट  यांनी  फसवणूक केली. तसेच एका फ्लॉट संदर्भातही फसवणूक केल्याची तक्रार   मांजरेकर यांनी  चेंबुर पोलीसठाण्यात दाखल केली. त्या नुसार तपास करून नये म्हणून 200 कोटी रूपर्य मागितल्याचा आरोप केला आहे.