Thu, Jul 09, 2020 20:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जिल्ह्यात आणखी २१ कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आणखी २१ कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated: Apr 18 2020 11:32PM

संग्रहित छायाचित्रनाशिक / मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील सातपूर-अंबड लिंक रोड भागात तीन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त वृृद्धेच्या संपर्कातील चौघांसह एकूण पाच जणांना,  मालेगाव येथे आणखी पंधरा जणांना व सिन्नर तालुक्यातील आणखी एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल शनिवारी (दि.18) प्राप्त झाला असून एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 21 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 91 झाली असून, प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. 

मालेगाव येथे शुक्रवारी (दि.17) 14 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. हे सर्व रुग्ण अगोदर सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील होते. शुक्रवारी आढळून आलेल्या रुग्णांना आधीच क्वारंटाइन केलेले होते. दरम्यान, शनिवारी दुपारी नाशिकच्या कोरोनाबाधित वृद्धेच्या संपर्कातील व नातलगांपैकी चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांनुसार मालेगाव येथे आणखी पंधरा जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.  शनिवारी (दि.18) सायंकाळपर्यंत प्रशासनाने एकूण 831 नागरिकांच्या घशातील स्रावाचे नमुने घेतले आहेत. त्यापैकी 577 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 79 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. परदेशातून आणि कोरोनाबाधितांच्या संपर्कात असलेल्या 1 हजार 369 नागरिकांची नियमित वैद्यकीय तपासणी सुरू असून, त्यातील 819 नागरिकांची 14 दिवस नियमित तपासणी झाली आहे. सात जण जिल्हा रुग्णालयात : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 91 असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील सात जण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात 5 तर मालेगाव मनपा रुग्णालयात 73 अशा एकूण 86 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच मालेगाव येथे तिघांचा व धुळे येथे रुग्णालयात मालेगावच्या तरुणीचा असा एकूण चौघा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गोविंदनगरचा रुग्ण निगेटिव्ह

नाशिक शहरातील गोविंदनगर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. या रुग्णाची वैद्यकीय चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णास कोरोना असल्याचा अहवाल 6 एप्रिलला प्राप्त झाला होता. या रुग्णाची आणखी वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून, त्याचाही अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यास घरी सोडण्यात येणार आहे. नाशिकमध्ये आढळून आलेला हा दुसरा कोरोनाबाधित रुग्ण होता. त्याच्या आधीच्या रुग्णाला बरा झाल्याने यापूर्वीच घरी सोडण्यात आले आहे. 

मालेगावी दोन संशयितांचा मृत्यू ; अहवाल प्रलंबित

शहरात कोरोनाची साथ पसरलेली असतानादेखील नागरिकांकडून खबरदारीकडे दुर्लक्ष होत आहे. रुग्ण ही तत्काळ उपचाराला प्राधान्य देत नाहीत. परिस्थिती बिकट झाल्यावरच रुग्णालयाकडे धाव घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. गत रविवारी दोन महिला, शुक्रवारी दोन वयोवृद्ध (एक पुरुष, एक महिला) तर शनिवारी (दि.18) दोघा संशयितांचा मृत्यू झाला. सामान्य रुग्णालयात नयापुरातील 65 वर्षीय वृद्ध, तर जीवन हॉस्पिटलमध्ये कमालपुरातील 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यांच्या स्वॅब तपासणी अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. शहराच्या पूर्व भागातून आता पश्चिम क्षेत्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. संगमेश्वर परिसरात पहिला रुग्ण आढळून आल्याने मालेगावकरांच्या चिंतेत भर पडली आहे.