Wed, Jun 03, 2020 17:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीतील एसआरएचा प्रकल्प मार्गी लागणार

अंधेरीतील एसआरएचा प्रकल्प मार्गी लागणार

Last Updated: Dec 03 2019 1:30AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अंधेरी येथे होणार्‍या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला अखेर विकासक मिळाला असून त्याने निविदा दाखल केली आहे. या प्रकल्पासाठी अनेकदा निविदा सूचना काढण्यात आली होती. अखेरची तारीख टळून गेल्यानंतरही विकासकांचा प्रतिसाद मिळाला नव्हता.  

2018 पूर्वी झोपडपट्टीधारकांनी गृहनिर्माण संस्था स्थापन करून खासगी विकासकाला प्रकल्पाचे काम दिले होते. मात्र वर्षभरात केवळ 20 टक्केच काम पूर्ण झाले. त्यानंतर या विकासकाने हे काम अर्धवट सोडले. 2018 मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने या अर्धवट राहिलेल्या प्रकल्पासाठी निविदाप्रक्रिया सुरू केली. मात्र त्यावेळी त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर अनेकदा निविदा काढण्यात आल्या मात्र कोणत्याही विकासकाने या प्रकल्पात रस दाखवला नाही. अखेर गेल्या आठवड्यात प्राधिकरणाला एका विकासकाचा प्रतिसाद मिळाला. अर्थात या विकासकाचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. काही तांत्रिक आणि वित्तीय पडताळणीनंतरच हे नाव उघड करण्यात येईल, असे प्राधिकरणाच्या वरिष्ठ अभियंत्याने सांगितले. 

या ओम नमो सुजलाम् सुफलाम् गृहनिर्माण संस्थेत 867 भाडेकरू असून त्यापैकी 128 जणांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. बाकीचे भाडेकरू प्रकल्पाच्या ठिकाणीच राहात आहेत. या संस्थेजवळ 21,882 चौ.मी.चे क्षेत्र असून त्यातील 6,500 चौ.मी.ची जागा सागरी अधिनियमन क्षेत्राखाली मोडते. राहिलेल्या 15,500 चौ.मी. जागेत हा प्रकल्प उभारला जाणार आहे. विकासकाला या प्रकल्पासाठी वाढीव चटई क्षेत्र मिळणार आहे. हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होईल, असा आशावाद प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकल्पातील काही भाडेकरूंसंदर्भात वाद आहेत मात्र ते यशस्वीपणे हाताळले जातील, असे दीपक कपूर म्हणाले. या प्रकल्पासाठी निवडण्यात आलेला विकासक आर्थिकदृष्ट्या सक्षम असून तो वेळेत हा प्रकल्प पूर्ण करेल. याआधी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाअंतर्गत असलेले प्रकल्प खासगी विकासकांमार्फत पूर्ण केले जात होते. याआधी प्राधिकरणाकडून केवळ ना हरकत प्रमाणपत्र आणि सूचनापत्र प्रकल्पासाठी दिले जात होते.