१४ फूट उंचीची  गणेशमूर्ती बसवण्याची परवानगी द्या

Last Updated: Jul 05 2020 1:25AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

एकीकडे बहुतेक गणेशोत्सव मंडळांकडून गणेशमूर्तीची उंची कमी करण्यात येत असतानाच किंग्ज सर्कल जीएसबी गणेशोत्सव मंडळाने सरकारकडे 14 फूट उंच गणेशमूर्ती बसवण्याची परवानगी मागितली आहे. मंडळाने केलेल्या निवेदनात सरकारच्या सर्व नियमांचे पालन करण्याची हमी देण्यात आली आहे. 

मंडळाचे विश्वस्त आर.जी.भट यांनी सांगितले की,  येत्या 22 ते 26 ऑगस्टदरम्यान मंडळ आपल्या 66व्या वर्षात पदार्पण करत आहे. दरवर्षी मंडळाची एकच मूर्ती असून त्याचीच पूजा अर्चा केली जाते. शास्त्रानुसार या मूर्तीची उंची कमी करता येत नाही. मूळ 14 फुटांच्या मूर्तीचा पाया आणि मुकुट परिधान केल्यानंतर बाप्पाची एकूण उंची 18 फुटांपर्यंत वाढते. या उंचीनुसार बाप्पाचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने घडविण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ही मूर्ती शाडूपासून तयार करण्यात येत असल्याने विसर्जनानंतर मूर्तीचे सहज विघटनही होते. संबंधित मूर्ती मंडपामध्येच तयार करण्यात येत असल्याने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चौदा फूट उंचीला परवानगी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. 

सरकारला पाठवलेल्या निवेदनात मंडळाने मूर्तीचे विसर्जन मंडपात कृत्रिम तलाव तयार करून त्यातच करण्याचे मान्य केले आहे. याशिवाय प्राणप्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत कुठल्याही भक्ताला मंडपामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही, अशी खात्रीही मंडळाने दिली आहे. भाविकांसाठी यंदा ऑनलाईन दर्शनाची आणि डिजिटल प्रसादाची व्यवस्था करण्याची ग्वाही मंडळाने सरकारला दिली आहे. यासोबत पूजा-अर्चा करणारे मास्क परिधान करतील, तर सरकारच्या नियमांप्रमाणे मंडपात निर्जंतुकीकरण केले जाईल, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

जीएसबी मंडळाने केलेल्या मागणीनंतर इतर मंडळांच्या भुवया उंचावल्या आहेत. सरकारने जीएसबी मंडळाची मागणी मान्य केल्यास इतर मंडळांना आपसुकच उंच मूर्ती बसवण्याची परवानगी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.