Wed, Aug 12, 2020 03:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसला हवे ऊर्जा; राष्ट्रवादीला अर्थ

काँग्रेसला हवे ऊर्जा; राष्ट्रवादीला अर्थ

Last Updated: Dec 11 2019 1:39AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप आता अंतिम टप्प्यात आले आहे. काँग्रेसने कृषी, ऊर्जा, आदिवासी; तर राष्ट्रवादीने सहकार, गृहनिर्माण आणि अर्थ खात्यासाठी आग्रह धरला आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेत येऊन पंधरवडा झाला तरी खातेवाटपावर अजून मोहोर उमटली नाही. मित्रपक्षांमध्ये खातेवाटपावरून रस्सीखेच असल्याने तिढा सुटत नसल्याची चर्चा आहे. पण हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या चर्चेला उत्तर देण्यास समोर मंत्रीच नसल्याची बाब विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधार्‍यांच्या नजरेस आणून दिली आहे. त्यामुळे कोंडीत अडकलेल्या सत्ताधार्‍यांनी खातेवाटपाला गती दिली असून त्याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

खातेवाटपाबाबतीत काँग्रेसने सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. त्यामध्ये डॉ. नितीन राऊत यांना नजरेसमोर ठेवून सामाजिक न्याय विभागासाठी आग्रह धरला होता. पण आपल्याला हा विभाग नको, असे डॉ. राऊत यांनी कळविल्याने काँग्रेसने आता ऊर्जा विभागासाठी आग्रह धरला असल्याचे समजते.

गृह, नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिढा कायम असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधी सोहळ्याला 10 दिवस झाले तरी अजूनही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेतलेले सहा मंत्रीही अजून बिनखात्याचेच आहे.