Fri, May 07, 2021 17:42
परमबीर यांनी ३.४५ कोटी उकळले

Last Updated: May 04 2021 2:38AM

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीच्या टार्गेटचा आरोप करणारे पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी आपल्याकडून 3 कोटी 45 लाख रुपये उकळल्याचा आरोप क्रिकेट बुकी सोनू जालान, केतन तन्ना आणि मुनीर पठाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे केला आहे. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी हे प्रकरण तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केल्याची माहिती आहे.

क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंह यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, सिंह यांचे खंडणी उकळण्याचेरॅकेट आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल खोट्या अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली. क्रिकेट बेटिंगचाही खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. 2018 साली परमबीर सिंह यांनी मकोका लावून आपल्याकडून 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केले. याशिवाय, सोनू जालान याने ठाणे पोलीस दलातील खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत.

मुनीर पठाण यांनीही आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आणि परमबीर सिंह यांच्या ठाणे पोलीस आयुक्तालयात चालणार्‍या खंडणी उकळण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश करून कारवाईची मागणी केली आहे.