Wed, May 12, 2021 02:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सर्वांगीण विकासासाठी छ. राजाराम महाराजांचे विचार महत्त्वाचे : मुख्यमंत्री

सर्वांगीण विकासासाठी छ. राजाराम महाराजांचे विचार महत्त्वाचे : मुख्यमंत्री

Published On: Aug 01 2018 1:31AM | Last Updated: Aug 01 2018 1:14AMमुंबई  : विशेष प्रतिनिधी 

महाराष्ट्राला शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे. हा वारसा पुढे नेण्याची सर्वांची जबाबदारी आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व समूहापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांचे विचार अत्यंत महत्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशील गर्जे यांच्या संपादकत्वाखाली तयार करण्यात आलेल्या छ. राजाराम महाराज यांचे विचार या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात झाले. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, छ. राजाराम महाराज यांच्या भाषणांचे संकलन होऊन त्याचे पुस्तक प्रकाशित होणे ही बाब अत्यंत आनंदाची आहे. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला आधुनिक भारताची मुहूर्तमेढ कोल्हापूर येथील संस्थानात रोवण्यात आली. छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, आर्थिक पातळीवर विकासाचा ध्यास घेत असताना समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय दिला पाहिजे, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत ही भूमिका मांडून प्रत्यक्षात आणली. कोल्हापूर येथे विमानतळ बांधणे असो किंवा मग कोल्हापूरला रेल्वे आणणे असो यावरुन राज्याची औद्योगिक प्रगतीही महत्वाची असल्याचे त्यांनी ओळखले, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

महाराष्ट्राच्या जडणघडणीत छ. शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक व आर्थिक न्याय काय असतो हे समजावून सांगितले. छत्रपती शाहू महाराज यांचे पुत्र छ. राजाराम महाराज यांनी हेच विचार महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात रुजविण्याचे काम केले. छ. राजाराम महाराज यांनी प्रजेचे सुख हेच आपले अंतिम कर्तव्य मानले. त्यातूनच त्यांचे समाजाच्या उन्नतीसाठी असलेले विचार दिसून येतात. छ. राजाराम महाराज यांना जनतेसाठी असलेली तळमळ नेमकी काय होती हेच पुस्तकात प्रसिध्द करण्यात आलेल्या भाषणातून समजते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

छ. राजाराम महाराज यांनी 25 व्या वर्षी कारभार हातात घेतला आणि जवळपास 18 वर्षे केला. पण याच काळात त्यांनी शिक्षण, सहकार, उद्योग, शेती , महिलांचे आरोग्य या क्षेत्रात काळाच्या पुढे जाऊन काम केले. शेतीसंदर्भातले वेगवेगळे प्रयोग, शाश्वत सिंचन पध्दत, जलयुक्त शिवार याचा त्यांनी जवळपास 100 हून अधिक वर्षांपूर्वी विचार केला होता, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 
सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. 

पुराभिलेख संचालनालयात 1630 पासूनचे दुर्मिळ अभिलेख जतन करण्यात आले आहेत. यात मराठी, मोडी, इंग्रजी, पर्शियन व उर्दू अभिलेखांचा समावेश आहे. पुराभिलेख संचालनालयामार्फत ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटीशकालीन राजकीय तसेच स्वातंत्र्य चळवळ, पेशवेकालीन अभिलेख, सातार्‍याचे छत्रपती, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीसंबंधातील अभिलेख, निजामकालीन कागदपत्रे, नागपूरकर भोसले यांची कागदपत्रे असा महत्वाचा अभिलेख जतन करण्यात आला आहे.