Sat, Oct 24, 2020 22:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मत्स्यव्यवसायाचे 4 हजार कोटींचे नुकसान

मत्स्यव्यवसायाचे 4 हजार कोटींचे नुकसान

Last Updated: Sep 23 2020 1:18AM
अलिबाग :  जयंत धुळप

कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका कोकणातील मासेमारीला बसला आहे. याचा प्रतिकूल परिणाम मासे निर्यातीवर झाला असून सुमारे 4 हजार कोटींचे नुकसान झाले आहे.

कोकणातून दरवर्षी दीड लाख मेट्रिक टन माशांची निर्यात होते. त्यातून जवळपास पाच हजार कोटींची उलाढाल होते. मात्र, लॉकडाऊनमुळे 20 हजार मेट्रिक टन माशांची निर्यात झाली. त्यामुळे जवळपास 4 हजार कोटींचा फटका या व्यवसायाला बसला आहे. मार्च ते ऑगस्ट या काळात मासेमारी बंदच होती. सप्टेंबरमध्ये हा व्यवसाय पूर्ववत झाला असून आतापर्यंत 20 हजार मेट्रिक टन माशांची निर्यात झाली असल्याची माहिती बंदर व्यवस्थापकांनी दिली. 

महाराष्ट्रात कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीत मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. या व्यवसायात स्थानिक 2 लाखांपेक्षा जास्त मच्छीमारांचा उदरनिर्वाह चालतो. रत्नागिरी, रायगड, अलिबाग, मुंबई ससून डॉक, पालघरमधील सातपाटी या केंद्रावर निर्यातक्षम मासेमारी केली जाते. स्थानिक बाजारात 40 टक्के माशांचे वितरण होते. तर 60 टक्के माशांची निर्यात होते. सन 2018-19 या मागील वर्षाच्या तुलनेत 2019-2020 मध्ये जेएनपीटी बंदरातून झालेल्या मासे व संलग्न मत्स्य उत्पादन निर्यातीत घट झाली असल्याचे दिसून येत आहे. सन 2018-19 मध्ये 1 लाख 58 हजार 213 मे. टन मासे व संलग्‍न मत्स्य उत्पादनांची निर्यात झाली होती, त्यामध्ये सन 2019-20 मध्ये 23 हजार 447 मे.टनाने घट होऊन 1 लाख 34 हजार 766 मे. टन मासे व संलग्‍न मत्स्य उत्पादनांची निर्यात झाली आहे. 2018-19 मध्ये प्राप्त 4811.12 कोटीमध्ये 451.41 कोटींची घट होऊन सन 2019-20 मध्ये 4359.71 कोटी रुपयांची निर्यात झाली. सन 2018-19 मधील परकीय चलनातील मूल्य 696.56 अमेरिकी दशलक्ष डॉलर होते. त्यामध्ये 73.16 अमेरिकी दशलक्ष डॉलरची घट होऊन सन 2019-20 मध्ये ते 623.40 यूएस मिलियन डॉलर झाले आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीत मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 9 मत्स्य प्रक्रिया उद्योग आहेत तर उर्वरित जिल्ह्यात एकूण 53 मत्स्य प्रक्रिया उद्योग असल्याची नोंद समुद्र उत्पाद निर्यात विकास प्राधिकरणाकडे आहे. मात्र यापैकी अनेक उद्योग गेल्या काही वर्षांपासून अपेक्षित प्रमाणात मासे उपलब्ध होत नसल्याने बंद आहेत. तर ज्यांनी निर्यातक्षम मासे उत्पादनात बदल केले, जे मासे उपलब्ध होतात त्यावर प्रक्रिया करून निर्यात करण्याचे धोरण अवलंबले ते उद्योग चालू असून त्यांच्या माध्यमातून निर्यात देखील होत असल्याची माहिती रत्नागिरी येथील राज्यातील एकमेव अशा फिशरीज कॉलेजच्या मत्स्य जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.स्वप्नजा मोहिते यांनी दिली. कोरोना महामारीच्या संकटामुळे मत्स्य निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम झाला असणार. परंतु मुळात समुद्रातील नवीन मासे निर्मितीची नैसर्गिक प्रक्रिया, नवी मासेमारी पद्धती आणि वाढलेले मासेमारी प्रमाण यामुळे दिवसेंदिवस घटत चालले असल्याने अपेक्षित जातीचे आणि अपेक्षित प्रमाणात मासे मुळात उपलब्ध होत नाहीत, हे एक प्रमुख कारण असल्याचे प्रा. डॉ. मोहिते यांनी सांगीतले.

कोळंबीला अधिक पसंती; म्हणून निर्यात जास्त 

• जेएनपीटी येथून जपान, अमेरिका, युरोपियन युनियन, चीन, साऊथ एशिया आदी देशांमध्ये मासे व संलग्‍न मत्स्य उत्पादनांची निर्यात होत असते. या मत्स्य निर्यातीमध्ये ओल्या माशांबरोबरच सुक्या माशांची देखील निर्यात होते. या व्यतिरिक्‍त माशांवर प्रक्रिया करून सीलबंद मासे व माशांचे मांस निर्यात केले जाते. प्रक्रिया करून निर्यात होणारे मासे अधिक काळ टिकणारे असल्याने त्यास अधिक प्रमाणात मागणी असते. 

• निर्यात होणार्‍या माशांमध्ये कोळंबी (प्रॉन्स) या जातीच्या माशाला अधिक पसंती असते. कोळंबी ते शेवंडी (लॉब्स्टर) या मत्स्य श्रेणीत अनेक प्रकार उपलब्ध असल्याने त्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असते. याशिवाय समुद्री खेकडा (क्रॅब)च्या विविध जाती उपलब्ध आहेत आणि त्यांचीही मोठ्या प्रमाणात निर्यात होते.

 "