राज्यातील दारूविक्री ५९ टक्क्यांनी घटली

Last Updated: Jul 14 2020 1:37AM
Responsive image


मुंबई : पुढारी डेस्क

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वच व्यवसायांना जबर फटका बसला आहे. सदासर्वदा तेजीत असणारा दारू व्यवसायही त्याला अपवाद राहिलेला नाही. चालू वर्षात एप्रिल ते जून या कालावधीत महाराष्ट्रातील दारूची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 59 टक्क्यांनी घटल्याची आकडेवारी पुढे आली आहे. 

राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्यावर्षीच्या एप्रिल ते जून या काळात 24.08 बल्क लिटर दारू रिचवली गेली होती. ते प्रमाण यावर्षी केवळ 9.89 बल्क लिटरवर आले. हा तोटा भरून काढण्यासाठी बराच मोठा काळ जावा लागेल, असे मत मद्यनिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनी वर्तवले आहे. 

राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांच्या म्हणण्यानुसार रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि परमिट रूममधून एकूण उत्पादनापैकी 50 टक्के बीअर रिचवली जाते, तर व्हिस्की, रम, स्कॉच, व्होडकासारख्या दारूची 30 टक्के विक्री या माध्यमातून केली जाते. तसेच देशी दारूपैकी 40 टक्के वाटा ही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट उचलतात. लॉकडाऊनच्या कालावधीत ही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद असल्याने त्याचा मोठा फटका या व्यवसायाला बसला आहे. तसेच अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, रोजगार ठप्प झाले. त्यामुळे त्यांनी दारू खरेदीबाबत आखडता हात घेतला. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये राज्याच्या एकूण दारूविक्रीपैकी 60 ते 70 टक्के विक्री होते. ही पाच शहरे कोरोनाची हॉटस्पॉट बनल्यामुळे तेथे दारूविक्रीला अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचाही मोठा फटका या व्यवसायाला बसला.

एप्रिलमध्ये राज्यातील दारूविक्री पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. पण 4 मे नंतर कोरोनाच्या प्रभाव कमी असणार्‍या भागांमध्ये सरकारने दारूविक्रीला परवानगी दिली. त्यानंतर रेड झोनमध्येही ही मुभा देण्यात आली. दारूची त्याचबरोबर घरपोच सेवाही सुरू झाली. 

भारतीय बनावटीच्या विदेशी दारूची विक्री नंदुरबार, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये 2019 च्या तुलनेत बर्‍यापैकी चांगली राहिली. 7 जुलैपर्यंत 29.94 लाख ऑर्डर्स घरपोच केल्या गेल्या. कमी किमतीच्या दारूला फटका बसला. कारण घरपोच आणि ई-कॉमर्सच्या माध्यमातून केवळ उंची दारूलाच मागणी होती. सार्वजनिक आणि सामाजिक समारंभ बंद असल्याने बीअर व्यवसायाला आतापर्यंतचा सर्वात मोठा फटका बसला. कोरोनाच्या काळात थंड पेय घेऊ नयेत, अशा सूचना असल्यामुळे बीअरकडे दुर्लक्ष झाले. 1 लाख 38 हजार लोकांनी कोरोनाच्या काळात दारू पिण्याचा परवाना काढला. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा 9 पटीने अधिक होता.