Mon, Sep 21, 2020 11:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेला मागे रेटण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू

शिवसेनेला मागे रेटण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू

Last Updated: Aug 07 2020 12:13AM
मुंबई : चंदन शिरवाळे

आगामी दोन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आता पक्ष विस्तारावर भर दिला आहे. या निवडणुकांमध्ये आपण नंबर एक वर कशाप्रकारे येऊ शकतो, यासंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे प्रमुख नेते आणि आपल्या मंत्र्यांना कानमंत्र दिला आहे.

एकीकडे श्रीराम मंदिराची पायाभरणी होत असतानाच पवार यांनी बुधवारी मुंबईत आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन पक्ष विस्ताराचीही मुहूर्तमेढ रोवली आहे. विधानसभेत 7  अपक्षांचा अपवाद वगळता शिवसेनेकडे 56 राष्ट्रवादीकडे 54 आणि काँग्रेसकडे 44 असे संख्याबळ आहे. केवळ 2 ते 3 आमदारांमुळे राष्ट्रवादीचे नंबर एकचे स्थान हुकले आहे. ही कसर भरून काढण्यासाठी पवार यांनी आता येत्या दीड ते दोन वर्षात राज्यात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे आपल्या नेत्यांचे आणि मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. कोरोना संकटापाठोपाठ कोकणात निसर्ग वादळाने मोठा तडाखा दिला आहे.

अशा परिस्थितीमध्ये इतर पक्षांच्या तुलनेने राष्ट्रवादीने नुकसानग्रस्तांना अधिक मदत दिली आहे.  कलाकार, स्टेज आर्टिस्ट तसेच दुष्काळग्रस्त शेतकरी व विद्यार्थ्यांनाही राष्ट्रवादीने अडचणीच्या वेळी दिलासा दिला आहे. भविष्यातही संकटग्रस्तांना मदत देण्यासाठी तत्पर रहा. लोकहिताची कामे आणि जनसंपर्काच्या बळावर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकवर येईल, अशा शब्दात पवार यांनी पक्षाचे नेते आणि मंत्र्यांना बळ दिल्याचे समजते.

कोरोना संपताच राज्यात तब्बल 15 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्या पाठोपाठ नवी मुंबई, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, वसई विरार आणि कोल्हापूर या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.2022 मध्ये सुमारे 27 जिल्हा परिषदा, 275 पंचायत समित्या आणि 15 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या तयारीला आतापासूनच कामाला लागा, असा आदेश पवार यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिल्याचे समजते.

शिवसेना आणि काँग्रेसला  चकवा देऊन आपण या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवलेच पाहिजे, त्यादृष्टीने संबंधित जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केले करावे, असे स्पष्ट आदेश पवार यांनी दिल्याचे  एका जेष्ट नेत्यांनी सांगितले. दोन दोन वर्षांनी होणार्‍या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील यशावरच लोकसभा निवडणुकीचे जागावाटप होऊ शकते. त्यानुसार आताच तयारी महत्वाची असल्याचा कानमंत्र आम्हाला दिल्याचेही या नेत्याने सांगितले.


 

 "