Tue, Sep 22, 2020 09:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आई कोरोनाबाधित, तर बाळाला दुर्मिळ हृदयदोष; अहमदनगरमधील कुटुंबाची फरपट

आई कोरोनाबाधित, तर बाळाला दुर्मिळ हृदयदोष; अहमदनगरमधील कुटुंबाची फरपट

Last Updated: Jul 02 2020 10:11PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अहमदनगरमधील एका बाळाला श्वास घेण्यास अडचण येत असल्याने कोरोना चाचणीसाठी आणल्यानंतर त्याच्या आईला कोरोनाची बाधा असल्याचे समोर आले. तर बाळाला दुर्मिळ हृदयदोष असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सध्या कोरोना बाधित आईवर कस्तुरबा रुग्णालयामध्ये, तर बाळावर वाडीया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाळाची शस्त्रक्रिया पार पडली असून सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. यात कुटुंबाची मात्र फार फरपट झाली आहे.

अहमदनगर येथे राहणाऱ्या कुटुंबातील घरी बाळाचे आगमन झाल्यामुळे प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. कोरोनासारख्या संकटकाळी देखील बाळ सुखरुप जन्माला आल्याने संपुर्ण कुटुंब खुश होते. मात्र जन्मानंतर आठवड्याभरातच बाळाला स्तनपानावेळी श्वासोच्छवासात अडचणी येऊ लागल्या. बाळाच्या पालकांनी त्वरित जवळील बालरोगतज्ञांची भेट घेतली. त्यावेळी इकोकार्डियाग्राफी तपासणी दरम्यान बाळाच्या श्वासाचा वेग वाढणे तसेच ह्दयदोष आढळून आला. तसेच बाळाच्या महाधमणीत ब्लॉकेज दिसून आले. 

बाळाच्या पालकांनी त्याला त्वरीत रुग्णवाहिकेने मुंबईच्या दिशेने धाव घेत वाडिया हॉस्पीटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले. बाळाचा हार्ट पंपिंग रेट १५ ट्क्के इतका कमी असून सर्वसामान्यांमध्ये तो कमीतकमी ५५ टक्के इतका असतो, असे डॉक्टरांच्या तपासणीत समोर आले

जेव्हा बाळाला घेऊन त्याचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले तेव्हा बाळाची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरेक्षेविषयी आवश्यक ती  खबरदारी घेत बाळाच्या शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. चार विविध थरांनी सुरक्षित असे पीपीई किटचा वापर शस्त्रक्रियेवेळी करण्यात आला. बाळाला त्वरित आयसोलेशन युनिटमध्ये दाखल केले आणि श्वासोच्छवासाच्या तीव्र अडचणी लक्षात घेता व्हेंटिलेटरवर ठेवले.

बाळाला असणारा हा जन्मजात दोष एकूण लोकसंख्येच्या २% बाळांमध्ये दिसून येतो, त्यापैकी १५-२०% -ह्दयाच्या झडपा ब्लोकेज, तर २५ % बाळांमध्ये जन्माच्या १ महिन्यानंतर ही स्थिती पहायला मिळते. बाळाची प्रकृती पाहता हार्ट वाल्व उघडण्यासाठी त्वरीत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रिया करण्यास उशीर केल्यास बाळाच्या जीवावर बेतू शकते ही गोष्ट लक्षात आल्याने बाळाला पुढील प्रक्रियेसाठी कार्डियाक कॅथेटरिझेशन प्रयोगशाळेत हलविण्यात आले. 

कोरोनाच्या चाचणीसाठी बाळ आणि आईची स्वॅब टेस्ट करण्यात आली. बाळ निगेटिव्ह मात्र आई कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आईला तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. आणि बाळाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

कोरोनाच्या भितीमुळे आम्ही खूपच घाबरलो होतो त्यात पहिल्या बाळाच्या जन्मानंतर आम्हाला आनंद झाला. जेव्हा त्याला हृदय दोष असल्याचे निदान झाले तेव्हा मात्र आम्हाला मोठा धक्का बसला. वाडिया हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी आम्हाला धीर देत वेळेवर व तातडीने उपचार केले नसते तर आम्ही आमच्या बाळाला गमावले असते. अशी भावना त्याच्या वडिलांनी व्यक्त केली.

वाडिया रूग्णालयात आम्ही कोविड संसर्ग झालेल्या मुलांबरोबरच इतर गंभीर दोष असलेल्या मुलांच्या उपचाराकरिता विशेष खबरदारी घेत आहोत. यशस्वी उपचारांसाठी आमचे डॉक्टर, परिचारिका आणि तंज्ञांच्या टीम झोकून काम करत असल्याने यश मिळत असल्याचे वाडिया ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.

 "