Wed, Sep 23, 2020 08:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अभिनेता सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे देऊ नये ः गृहमंत्री

अभिनेता सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे देऊ नये ः गृहमंत्री

Last Updated: Aug 09 2020 12:48AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिस योग्य दिशेने तपास करीत आहेत. हा तपास सीबीआयकडे देऊ नये, अशी आमची भूमिका आहे. मात्र, त्याविषयी आता 11 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर राज्य सरकार तपासाची पुढची दिशा ठरवेल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यावरून सध्या गदारोळ सुरू आहे. नागपूर येथे कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक घेतल्यानंतर ते जिमखाना येथे पत्रकारांशी बोलत होते. दि. 11 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात जो काही अंतिम निर्णय येईल यानंतरच तपासाची पुढील दिशा स्पष्ट होईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बिहार पोलिसांच्या मागणीवरून सीबीआय चौकशी लावण्यात आली आहे. बिहार पोलिस अधिकार्‍याला क्‍वारंटाईन केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आधीच्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारला खडसावले होते. तर बिहार पोलिस राजकीय दबावापोटी काम करत असल्याचा राज्य सरकारने न्यायालयात आरोप केला आहे. बिहार पोलिसांच्या हस्तक्षेपालाही राज्य सरकारचा विरोध आहे. मुंबई पोलिसांचा तपास सुरू असल्याने तपास सीबीआयकडे देण्यास रिया चक्रवर्तीच्या वकिलांचाही विरोध आहे.

विंग कमांडर दीपक साठे यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

दरम्यान, कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा मृत्यू झाला. नागपुरातील पुरोहित लेआऊट, भरतनगर येथे वास्तव्यास असलेल्या त्यांच्या आई-वडिलांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेत सांत्वन केले. विशेष म्हणजे, आजच विंग कमांडर दीपक यांच्या आईचा वाढदिवस होता. अशा दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक विमानतळांसंदर्भात नागरी उड्डयन मंत्रालय व केंद्र सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी भूमिका यावेळी कुटुंबीयांनी व्यक्‍त केली. आपण केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

 "