Mon, Sep 21, 2020 11:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अतिरिक्त शुल्क आकारणार्‍या महाविद्यालयावर होणार कारवाई

अतिरिक्त शुल्क आकारणार्‍या महाविद्यालयावर होणार कारवाई

Last Updated: Aug 07 2020 12:18AM
मुंबई ः पुढारी वृत्तसेवा

मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांमध्ये खुल्या व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून गेल्या 10 वर्षांपासून अतिरिक्त शुल्क आकारात असल्याची बाब उघड झाली आहे. याबाबत कोकण विभागीय उच्व शिक्षण सहसंचालकांनी विद्यापीठाला संबंधित महाविद्यालयावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा कार्यअहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या 823 कॉलेजांमधील सात लाखांहून अधिक खुल्या व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून 2008-09 पासून अद्यापर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. अनुदानित अभ्यासक्रमांना किती शुल्क आकारावे याबाबत विद्यापीठाने 2008 मध्ये परिपत्रक काढलेले आहे. यात प्रवेश देताना विद्यार्थ्यांकडून केवळ नऊ प्रकारचेच शुल्क आकारावे असेही यात स्पष्ट केले. असे असले तरी विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहेत.  सुराज्य विद्यार्थी संघटनेने मुख्यमंत्री तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे.

यानंतर संघटनेने कोकण विभागीय आयुक्तांकडेही तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेऊन विभागीय संचालकांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांना पत्र लिहून या तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी आणि कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबत सुचना केली आहे. विद्यापीठाने बीए, बीकॉम, बीएसस्सी, बीएमएस, बीएमएम आणि एलएलबी या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतेवेळी नेमके कोणत्या बाबींचे शुल्क आकारावे याबाबत स्पष्टता दिली आहे. 

यात कॉलेज विद्यार्थ्यांकडून प्रवेश प्रक्रिया शुल्क, कागदपत्र छाननी शुल्क (लागू असल्यस), ओळखपत्र शुल्क, आपत्ती व्यवस्थापन निधी, समुह विमा शुल्क, विद्यार्थी कल्याण निधी, ई सुविधा, माजी विद्यार्थी संघटना, कुलगुरू निधी असे शुल्क घेण्यास परवानगी आहे मात्र याचे पालन बहुतांश महाविद्यालय करत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनेचे सचिव अमर एकाड यांनी स्पष्ट केले.
 

 "