Sun, Sep 20, 2020 05:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरे कारशेडचे काम अखेर थांबवले

आरे कारशेडचे काम अखेर थांबवले

Last Updated: Sep 17 2020 2:04AM

संग्रहीत फाेटाेमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मेट्रो-3 चे कारशेड आरे कॉलनीत बनणार नसल्याचे राज्य सरकारने नुकतेच जाहीर केले. यासाठी पर्यायी जागेचा विचार केला जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले. हाच इशारा समजून संबंधित कंत्राटदाराने साईटवरील सामानाची आवराआवर करायला सुरुवात केली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून याबाबत माध्यमांना माहिती देण्यात आली आहे. मागील युती सरकारच्या काळात शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि पर्यावरणप्रेमींकडून शासनाच्या आरे कॉलनीत कारशेडच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात आला.

यावेळी शासनाकडून आंदोलनकर्त्यांविरोधात मोठी कारवाईदेखील करण्यात आली. मात्र युती सरकार जाताच महाविकास आघाडी सरकार काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेडसाठी पर्यायी जागा शोधण्यासाठी समिती नेमली. तेव्हापासून मुंबई मेट्रो-3 च्या आरेतील 33 हेक्टरवरील कारशेडच्या कामावर ‘स्टे’ आला होता. या जागेवर नजर ठेवणार्‍या आरे संवर्धन समूहाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, मेट्रो  रॅम्पच्या बांधकामासाठीचं कामकाज मागील आठवड्यापर्यंत सुरू होते.जेव्हा एखादी भूमिगत मेट्रो अंधेरी (डशशिू) पर्यंत येते त्यावेळी ती जोगेश्वरी, विक्रोळी लिंक रोड ओलांडून आरेतील 33 हेक्टरवरील कारशेडमध्ये प्रवेश करू शकेल, असे याचे डिझाईन आहे.

सध्या मुंबई मेट्रो 3 च्या कारशेडचे काम पूर्णतः बंद आहे. शासनाने कारशेडसाठी गोरेगाव पहाडी येथील खासगी जागेबाबत चाचपणी देखील सुरू केली आहे. त्यामुळे सध्या आरेतील प्रत्यक्ष साईट बंद करायचे काम सुरू आहे. या ठिकाणचे आधीचे बांधकाम आणि केलेली मोडतोड साफ केली जात आहे. कंत्राटदारांकडून या साईटवरील खड्डे देखील बुजवले जात आहेत. जेणेकरून ही साईट अधिक सुरक्षित होईल.

डिसेंबरमध्ये जेव्हा मुंबई मेट्रो 3 कारशेड कामावर स्टेफ आला तोवर तिथे मोठ्या प्रमाणात काम सुरू होते. आता सध्या तिथे कोणतेही नवीन काम केले जात नसल्याचे समजते. आता त्या साईटवरील सर्व साहित्य काढून टाकायला सुरुवात केलेली आहे. काम थांबले आहे, मात्र कंत्राटदाराने आणलेली बरीच साधनसामग्री साईटवर आहे. आता ही साधनसामुग्री दुसर्‍या कन्स्ट्रक्शन साईटवर हलवण्यात येणार असल्याचे एमएमआरसीएल कडून सांगण्यात आले.

कारशेडसाठी सध्या 2 जागांचा विचार केला जात असल्याचे समजते. यामध्ये कांजूरमार्गवरील 41 हेक्टरची जागा देखील आहे जिचा वापर मेट्रो सहाच्या कारशेडसाठी केला जाऊ शकतो. याशिवाय गोरेगाव पश्चिमेतील पहाडी या 89 हेक्टरवरील जागेचा देखील विचार केला जात आहे. मात्र कारशेड नेमकं कुठे उभारले जाईल याविषयी माहिती देण्यास एमएमआरसीएलच्या अधिकार्यांनी नकार दिला.

 "