Tue, Jul 14, 2020 11:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी नवीन शासकीय मराठी महाविद्यालय सुरू होणार'

'सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी नवीन शासकीय मराठी महाविद्यालय सुरू होणार'

Last Updated: Jun 30 2020 8:57PM

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतमुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागाची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन, मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत विद्यापीठाचे उपकेंद्र/नवीन शासकीय मराठी महाविद्यालय लवकर स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात या शासकीय मराठी महाविद्यालयासाठी पाच एकर जमीन उपलब्ध देण्यात येणार आहे. त्याचा बृहत आराखडा तयार करून या महाविद्यालयाला शासन स्तरावरील सर्व मान्यता देण्यात येतील. सीमा भागात महाविद्यालये स्थापन करणे तसेच शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री सामंत यांनी माहिती दिली.

पुढील शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सन २०२१ – २०२२ पासून प्रवेश देण्यात येतील. सीमाभागातील मराठी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांना अधिक दर्जेदार शिक्षण या महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. 

सीमा भागात शासकीय मराठी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी समिती गठीत

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत शासकीय मराठी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. यात उच्च शिक्षण संचालक, जिल्हाधिकारी कोल्हापूर, पोलीस अधीक्षक कोल्हापूर, डॉ.दीपक पवार, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, यांचा समावेश आहे.