Sat, Oct 31, 2020 12:17



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण : घटस्थापनेला एकाच रुग्णालयात ९ मुलींचा जन्म!

कल्याण : घटस्थापनेला एकाच रुग्णालयात ९ मुलींचा जन्म!

Last Updated: Oct 18 2020 1:45PM




डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

नवरात्रौत्सवाचा पहिला दिवस कल्याणमधील एका खासगी रूग्णालयासाठी काहीसा खास आणि दुर्मिळ असाच अनोखा योगायोग ठरला. या रुग्णालयात काल (शनिवार)  एकाच दिवशी तब्बल 9 मुलींचा जन्म झाल्याची लक्षवेधी घटना घडली आहे. विशेष म्‍हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्मिळ योगायोगाची वैद्यकीय क्षेत्रासह सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे.

कल्याणमधील डॉ. अश्विन कक्कर यांची सामाजिक आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून सर्वत्र ओळख आहे. त्यांच्या रुग्णालयातील शनिवारचा दिवस त्यांच्यासाठी काहीसा वेगळाच ठरला. त्यांच्या रुग्णालयात थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 11 महिलांची प्रसूती करण्यात आली. ज्यामध्ये 11 पैकी 9 महिलांनी मुलींना जन्म दिल्याची माहिती डॉ. अश्विन कक्कर यांनी दिली. 

विशेष म्हणजे शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली. नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी या रुग्णालयात 9 मुलींचा जन्म झाला. त्यामूळे जणूकाही 9 जणींच्या रूपाने नवदुर्गांनीच जन्म घेतल्याची भावना कल्याणकरांतून व्यक्त होत आहे. आमच्या रुग्णालयात एकाच दिवशी 11 प्रसूती होणे ही तशी नवीन गोष्ट नाही. मात्र एकाच दिवशी आणि तेही नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 9 मुलींचा जन्म होणे ही नक्कीच दुर्मिळ आणि आनंदाची बाब असल्याचेही डॉ. कक्कर यांनी सांगितले. या 9 मुलींसह इतर 2 मुलांची आणि त्यांच्या मातांची प्रकृती ठणठणीत असून, नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या 9 मुलींच्या जन्माची चर्चा सर्वत्र सुरू आहे.





 







"