Sat, May 30, 2020 13:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत 8 नवे कोरोना हॉटस्पॉट

मुंबईत 8 नवे कोरोना हॉटस्पॉट

Last Updated: Apr 07 2020 1:02AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील कोरोनाचे वीसपेक्षा अधिक रुग्ण आढळलेले आठ विभाग पालिकेने हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले असून त्या भागात अधिक कठोर उपाय योजले जाणार आहेत. महापालिकेच्या विभागांपैकी ‘जी दक्षिण’ आणि ‘ई’ हे वॉर्ड अतिगंभीर हॉटस्पॉट म्हणून जाहीर झाले असून, याच विभागांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा आणि खासगी निवासस्थान मातोश्रीदेखील येते. 

या दोन्ही प्रशासकीय विभागांपैकी ‘जी दक्षिण’मध्ये मुंबईतील सर्वाधिक म्हणजे 68, तर ‘ई’ वॉर्डमध्ये 44 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. पाच एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीवरून मुंबई महापालिकेने हे हॉटस्पॉट ठरवले आहेत. ‘ई’ वॉर्डमध्ये भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर हे दाट वस्तीचे भाग येतात. याच भागात काल रुग्ण आढळल्याने हा भाग पाचव्या क्रमांकावरुन थेट दुसर्‍या क्रमांकावर गेला आहे. याचबरोबर ‘के पूर्व’ आणि वांद्रे-कलानगरचा समावेश असलेला ‘एच पूर्व’ यांच्यात केवळ एकाच रुग्णसंख्येचा फरक असून कलानगर परिसरात एक जरी रुग्ण वाढला, तरी तो अतिसंवेदनशील ठरू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे याच भागात येते.

सोमवारी जी दक्षिण विभागातील वरळी, लोअर परळ, करी रोड भागात एकाच दिवशी 10 रुग्ण आढळून आले. भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर भागात यापूर्वी 19 रुग्ण सापडले होते. मात्र दुसर्‍या दिवशी 25 रुग्ण वाढल्याने हा आकडा 44 वर पोहोचला आहे. या रुग्णांच्या 32 जण संपर्कात आले आहेत. जोगेश्वरी पश्चिम, अंधेरी पश्चिम, जुहू, विलेपार्ले पश्चिम भागातही 12 रुग्ण आढळले आहेत. मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजीअली परिसरात तीन रुग्ण वाढले. मात्र हा परिसर संवेदनशील असल्याने खबरदारी घेण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे. याच शिवाय जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व भागात 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रुग्णांच्या संपर्कात पाच जण आले आहेत. वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रूझ पूर्व परिसरात 2 नवे रुग्ण सापडले आहेत. मालाड, मालवणी, मढ चौपाटी आणि चुनाभट्टी, टिळकनगर, चेंबूर, गोवंडी भागात 37 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडतील, तो भाग सील करण्याची कारवाई सुरूच राहील, असे पालिका उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.