Tue, Aug 04, 2020 14:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 11.25 लाख शेतकर्‍यांना जुलैअखेर कर्जमाफी; 8,200 कोटी खात्यांत येणार

11.25 लाख शेतकर्‍यांना जुलैअखेर कर्जमाफी; 8,200 कोटी खात्यांत येणार

Last Updated: Jul 03 2020 1:25AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

कर्जमाफी योजनेतील पात्र 11 लाख 25 हजार शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर जुलैअखेरपर्यंत 8 हजार 200 कोटी रुपये जमा करण्यात येणार असल्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी सांगितले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ न मिळालेल्या पात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकर्‍यांना याचा लाभ मिळेल, असेही ते म्हणाले. आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांसाठी सरकारने ही कर्जमुक्ती     योजना सुरू केली आहे. त्यातच कोरोनाचे महासंकट आल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे होते. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत अडचणी निर्माण झाल्या होत्या. तिसर्‍या यादीतील शेतकर्‍यांना लाभ मिळण्यास त्यामुळे उशीर झाला. सध्या खरिपाच्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. तिसर्‍या यादीतील पात्र शेतकर्‍यांना याचा लाभ देण्यासाठी 2 हजार कोटी रुपये रक्कम वर्ग करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत 11 लाख 25 हजार शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर 8 हजार 200 कोटी रुपये वर्ग करण्यात येणार आहेत. ज्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांनी आधारकार्ड प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले.