Sun, Sep 20, 2020 04:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईकरांची  झोप उडाली; 79 टक्के लोक कामावर पेंगतात!

79 टक्के मुंबईकर कामावर पेंगतात!

Published On: Jun 01 2018 11:40AM | Last Updated: Jun 01 2018 11:40AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईकरांना पुरेशी झोप मिळत नसून त्याचे परिवर्तन निद्रानाश, असंतुलित झोप यांसारख्या समस्यांमध्ये होत असल्याची धक्कादायक बाब वेकफिट या भारताच्या आघाडीच्या मॅट्रेस आणि झोपेशी संबंधित उत्पादनांच्या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाली आहे. पुरेशी झोप मिळत नसल्याचा परिणाम मुंबईकरांच्या कामावरदेखील होत असून त्यांनी कामावर झोप येत असल्याचे मान्य केले आहे. 79टक्के मुंबईकरांना आठवड्यातून 1-3 वेळा कामावर झोप येते, आठवड्यातून 4-5 वेळा झोप येणार्‍यांचे प्रमाण 6 टक्के आहे तर रोज कामावर झोप येणार्‍यांचे प्रमाण 15 टक्के इतके आहे.

वेकफिटने मुंबईत तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे 7500 नागरिकांना यासंबंधी प्रश्‍न विचारुन सर्व्हे केला. हे सर्वेक्षण विविध प्रकारच्या प्रतिसादकांवर करण्यात आले आहे. यातील 71 टक्के लोक विवाहित आहेत, 26 टक्के लोक अविवाहित आणि 3 टक्के लोकांची झोप उडाली आहे. म्हणजेच ते प्रेमात पडले आहेत. सातत्यपूर्ण अपुर्‍या झोपेचा व्यक्तीच्या मन आणि शरीरावर परिणाम हातो. सतत थकल्यासारखे वाटते आणि त्याचा त्रासही होतो. वेकफिटच्या सर्वेक्षणातून हीच बाब प्रकर्षाने जाणवते. अपुर्‍या झोपेमुळे 53 टक्के लोकांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे तर 18 टक्के लोकांना निद्रानाशाची समस्या भेडसावत आहे.

सर्वेक्षणातून असे दिसून आले की 17 टक्के लोक मध्यरात्रीनंतर झोपतात आणि 40 टक्के लोक रात्री 11 नंतर झोपतात. खरे तर, मनुष्याच्या शरीराच्या रचनेनुसार रात्री 10 ते 10.30 ही झोपण्याची नियमित वेळ असावी असा सल्ला दिला जातो, पण या वेळेत झोपी जाणार्‍यांचे प्रमाण केवळ 28 टक्के इतकेच आहे. रात्री उशिरा झोपल्यामुळे व्यक्ती उशिरा उठतो, असे मत 20 टक्के लोकांनी व्यक्त केले असून ते सकाळी 8 नंतर जागे होतात. सुमारे एक तृतीयांश म्हणजे 31 टक्के लोकांना सात तासांपेक्षा कमी झोप मिळते तर 18 वर्षे वयाखालील 27 टक्के लोकांना फक्त 6 तासांची झोप मिळते. ही त्यांच्या वाढीच्या महत्वाच्या टप्प्यात अत्यंत धोकादायक गोष्ट आहे.

या सर्वेक्षणाबाबत बोलताना वेकफिटचे सहसंस्थापक अंकित गर्ग म्हणाले, ग्रेट इंडियन स्लीप कार्ड 2018 मधील अत्यंत महत्वाची बाब म्हणजे जितका जास्त विकास होत आहे तितके आपल्या भारतीयांना निद्रानाश, असंतुलित झोप आणि पाठीच्या समस्या भेडसावत आहेत. याशिवाय, प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की आपल्याला अगदी 5-6 तासांची झोप मिळाली तर आपल्याला चांगला आराम मिळेल.

झोपेची योग्य सवय आणि झोपण्याचे दर्जेदार साहित्य जसे चांगली गादी आणि बेडशीट यांच्यामुळे आपल्याला चांगली झोप मिळू शकते असे मत सर्व्हेवेळी अनेकांनी व्यक्त केले. झोपेच्या समयी स्मार्टफोन आणि लॅपटॉपचा वापर टाळल्यास 26 टक्के लोकांना चांगली झोप लागेल असे वाटते, तर जवळपास 47 टक्के लोकांच्या मते त्यांच्या गादीचा दर्जा सुधारल्याने त्यांना जास्त चांगले आणि शांतपणे झोपता येईल.

मुंबईकरांना रात्रभर जागवणार्‍या गोष्टींमध्ये स्मार्टफोन्सपासून टीव्हीपर्यंत सातत्याने मनोरंजन करणारी साधने यांचा समावेश आहे. सुमारे 24 टक्के नागरिकांनी सांगितले की मोबाइल फोन आणि टीव्हीवर शो आणि वेब सीरीज पाहिल्याने ते जागे राहतात, 15 टक्के लोक अगदी पहाटेपर्यंत आपल्या लॅपटॉपवर काम करतात तर 21 टक्के लोक सोशल मीडिया फीड्स सातत्याने तपासत राहतात. सुमारे 22 टक्के लोकांनी भविष्याची चिंता हे झोप उडण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले.