Tue, Jul 14, 2020 13:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चक्क एका ॲम्बुलन्समध्ये कोरोनाचे ८ रुग्ण! 

चक्क एका ॲम्बुलन्समध्ये कोरोनाचे ८ रुग्ण! 

Last Updated: Jul 01 2020 11:29AM
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराचा एक प्रकार समोर आला आहे. एका ॲम्बुलन्समधून चक्क कोरोनाचे 7 ते 8 रुग्ण बसवून त्यांना हॉस्पिटलकडे नेण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

वाचा : कोरोनाचा कहर : ठाणे जिल्ह्यात 1484, मुंबईत 903 तर राज्यात 4878 नवे रुग्ण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जवळपास 5000 च्या आसपास पोहोचली आहे. महापौर विनिता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, आदींनी कोरोना विरोधातील लढ्यासाठी केडीएमसी सज्ज असल्याचा दावा केला आहे. रुग्णांना उपचार मिळण्यात कुठेही कमतरता नाही. तथापी कोरोना महामारीचा फैलाव इतक्या वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये एकाला उपचारासाठी बेड मिळाला नाही, तर दुसऱ्याला वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे कल्याण-डोंबिवलीत भीतीचे वातावरण आहे. या असे अनेक घटनानंतर कल्याणमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. 

कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बेतुरकर पाड्यातील विनोद पॅलेस सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका परिवारातील दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. या दोघांना नेण्यासाठी केडीएमसीची ॲम्बुलन्स संध्याकाळी साडेपाच वाजता आली असता त्याच्यामध्ये अगोदरच पाच ते सहा रुग्ण बसलेले आढळून आले. त्यात विनोद पॅलेस सोसायटीतील दोन रुग्णांची भर पडली. त्यामुळे ॲम्बुलन्समध्ये रुग्णांची गर्दी झाली. या सगळ्या रुग्णांना टाटा आमंत्रा हॉस्पिटलकडे नेण्यात आले. या रुग्णांमध्ये महिलांची संख्या मोठी होती. या प्रकाराची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

वाचा : लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय

एकीकडे कोविड -19 चे रुग्ण वाढू नयेत यासाठी आटापिटा करण्यात येत आहे. प्रशासन कोरोना महामारीला रोखण्याकरिता मोठा गाजावाजा करत आहे. तर दुसरीकडे याच प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा नमुना चव्हाट्यावर आला आहे. या धक्कादायक प्रकाराची माहिती गणेश चौधरी या कल्याणच्या प्रत्यक्षदर्शी जागरूक नागरिकाने दिली. या संदर्भात वैद्यकीय आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता कुणीही बोलण्यास तयार नव्हते.