Fri, Jul 03, 2020 00:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात पहिल्यांदाच उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद! भारत जगात ९ व्या स्थानी 

देशात पहिल्यांदाच उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद

Last Updated: May 29 2020 7:16PM

file photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

देशात पहिल्यांदाच एका दिवसात उच्चांकी साडे सात हजारांच्या घरात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आलेखामुळे सर्वाधिक रूग्णसंख्या असलेल्या देशांच्या तालिकेत भारत नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

ईशान्य भारतात ज्या राज्यांमध्ये पूर्वी कोरोनाग्रस्तांचे प्रमाण नियंत्रणात होते, अशा ठिकाणी कोरोनारूग्णांची संख्या वाढत आहे. नॉगालॅंड, लद्दाख तसेच मणिपूर मध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या कमी होती. पंरतु, गेल्या एका आठवड्यात या राज्यांमध्ये रूग्ण संख्येत कमालीची वाढ नोंदवण्यात आली आहे.  नॉगालॅंडमधील कोरोनाबाधितांची संख्या ४ वरून १८ झाली आहे. तर लद्दाखमध्ये रूग्णसंख्येत ३८ टक्के, मणिपूरमध्ये २५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख ६५ हजार ७९९ झाली आहे. गेल्या एका दिवसांत ७ हजार ४६६ नवे रूग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ७१ हजार १०६ जणांनी कोरोनाला मात दिली आहे. तर, ४ हजार ७०६ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या एका दिवसात १७५ कोरोनाबाधितांचा विविध राज्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

देशात आतापर्यंत ३४ लाख ८३ हजार जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यातील १ लाख २१ हजार जणांची वैद्यकीय तपासणी गेल्या एका दिवसात करण्यात आली. देशात सध्या ६४१ प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची तपासणी केली जात असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) देण्यात आली आहे.
 
मंत्रालयाच्या आकडेवारीनूसार गेल्या एका दिवसात ३ हजार ४१४ नागरिकांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये सर्वाधित कोरोनामुक्त नागरिकांना डिस्चार्ज करण्यात आले. गेल्या एका दिवसात गुजरात मध्ये ३६७ नवीन रूग्ण आढळले, तर २२ जणांचा मृत्यू झाला. यादरम्यान ४५४ जणांनी कोरोनावर मात मिळवली. उत्तर प्रदेशात १७९ नवीन कोरोनाग्रस्त आढळले. १५ जणांचा मृत्यू झाला, तर २२४ नागरिकांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली.  महाराष्ट्रात लागोपाठ​ तिसऱ्या दिवशी सर्वाधित ८५ मृत्यूची नोंद घेण्यात आली. 

देशातील कोरोनाबाधितांची संख्या (शुक्रवारी संध्याकाळी ५ पर्यंत) 
एकूण कोरोनाग्रस्त- १ लाख ६५ हजार ७९९
कोरोनामुक्त- ७१ हजार १०६ 
मृत्यू - ४ हजार ७०६
सक्रिय रूग्ण- ८९ हजार ९८७  
गेल्या एक दिवसात वाढलेले रूग्ण 
नवीन रूग्ण- ७ हजार ४६६
मृत्यू -१७५ 
कोरोनामुक्त- ३ हजार ४१४ 
आतापर्यंत एकूण तपासण्या- ३४ लाख ८३ हजार ८३८ 
गेल्या एका दिवसात तपासण्या- १ लाख २१ हजार ७०२