Fri, Jul 03, 2020 02:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात तीन दिवसांत ५० रुग्णांचा मृत्यू

ठाण्यात तीन दिवसांत ५० रुग्णांचा मृत्यू

Last Updated: Jun 02 2020 12:59AM

संग्रहित छायाचित्रठाणे : पुढारी वृत्तसेवा

ठाणे जिल्ह्यात गेल्या 48 तासांमध्ये 885 नवे रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. सोमवारी जिल्ह्यात नोंदवलेल्या 399 रुग्णांपैकी ठाण्यातील 164 आणि नवी मुंबईतील 80 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधितांची संख्या 8 हजार 666 वर गेली असली, तरी त्यापैकी  4 हजार 119 रुग्णांनी कोरोनावर मात करून घर गाठले आहे.  दुर्दैवाने मृतांचा आकडा वाढत असून सलग तिसर्‍या दिवशी 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 72 तासांमध्ये 49 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 273 वर गेला आहे. एका माजी नगरसेविकेसह ठाणे पोलीस मुख्यालयातील आणखी 4 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत 164 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्ण संख्या तीन हजार 102 झाली आहे. आणखी चिरागनगर, कौसा, आंबेवाडी, हरदासनगर, खारेगांव येथील पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 94 वर पोहचला आहे. त्यापैकी 62 पुरूष आणि 32 महिला आहेत. रविवारी देखील पाच जण मृत पावले होते. 1हजार 363 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आजमितीला 1 हजार 739 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. ठाण्यातील 21 हजार 543 संशयीतांची कोरोनाचा तपासणी करण्यात आलेली आहेत. त्यापैकी अद्याप 136 रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. नव्या रुग्णांमध्ये लोकमान्यनगर, सावरकरनगर, वागळे, कळवा, मुंब्रा, कोपरी, नौपाडा, माजीवडा-घोडबंदररोडसह झोपडपट्टी परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. एका माजी नगरसेविकेलाही कोरोनाची लागण झालेली आहे. 

नवी मुंबई महापालिकेत 80 नव्या रुग्णांची भर पडली, तर दोन रुग्णांनी प्राण गमावल्याने मृतांचा आकडा 75 वर पोहोचला आहे. एक हजार 397 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आजमितीला 812 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात 51 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. क्वारंटाईन कालवधी 21 हजार819  जणांनी पूर्ण केला आहे. त्याचवेळी नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 720 जणांचे कोरोना अहवाल प्रलंबित आहेत. कल्याण  डोंबिवली मनपा क्षेत्रात विक्रमी 62 नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 96 वर गेली आहे. टिटवाळ्यातील 70 वर्षीय महिला आणि कल्याण पश्‍चिमेकडील 65 वर्षीय रुग्ण कोरोनामुळे दगावल्याने मृतांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. 383 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला असून आजमिताला फक्त 681 रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. नव्या रुग्णांपैकी कल्याण पूर्व 12, कल्याण पश्चिम 25, डोंबिवली पूर्व 10, डोंबिवली पश्चिम 13 व टिटवाळा मांडा 2 असे रुग्ण सापडले आहेत. 

ठाण्याप्रमाणे मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात सातत्याने रुग्ण वाढत असून रविवारी 89 तर सोमवारी 19 नवे रुग्ण सापडले. येथील रुग्णसंख्या 757 वर पोहोचली आहे. नव्या दोन मृतांसह एकूण मृतांची संख्या 31 वर पोहोचली आहे. आजपर्यंत 425 जण बरे होऊन घरी असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या  301  इतकी आहे.

भिवंडीत पुन्हा रुग्णांची संख्या वाढत असून दिवसभरात चार रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत 11 जण मरण पावले असून एकूण रुग्णांची संख्या 165 वर पोहोचली आहे. दुसरीकडे भिवंडी ग्रामीणसह ठाणे ग्रामीण भागात 10 नवे रुग्ण सापडले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 371 वर गेली आहे. येथे 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.