Thu, Dec 03, 2020 07:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशातील ४४१ पायाभूत प्रकल्प रखडले

देशातील ४४१ पायाभूत प्रकल्प रखडले

Last Updated: Oct 27 2020 1:26AM
मुंबई : पुढारी डेस्क

भूसंपादनातील अडथळे, पर्यावरणविषयक परवानगीस विलंब आणि कायदा - सुव्यवस्थेच्या प्रश्‍नांमुळे देशातील 441 पायाभूत प्रकल्पांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.या वाढलेल्या खर्चाची एकत्रित किंमत 4.35 लाख कोटी रुपयांची आहे. 

केंद्राच्या सांख्यिकी विभागाने नुकताच एक अहवाल जाहीर केला. त्यात 150 कोटी किमतीहून अधिक मोठ्या असणार्‍या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे. केंद्राकडून सुरू असणार्‍या 1661 प्रकल्पांची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. यातील केवळ 9 प्रकल्प वेळेआधी पूर्ण होतील, अशा स्थितीत आहेत. 206 प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील, असे या अहवालात नमूद आहे. या 1661 प्रकल्पांची किंमत 20.9 लाख कोटींची होती. ती वाढून आता 25.26 लाख कोटींवर गेली आहे. म्हणजेच तिची किंमत 20.81 टक्क्यांनी वाढली आहे. 

पायाभूत प्रकल्प राबवताना अनेक अडथळे येतात. त्यात भूसंपादनाचा विषय मोठा असतो. त्याला विलंब झाला की, प्रकल्प रखडतो. तसेच अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. पर्यावरणाच्या दृष्टीने लागणार्‍या परवानग्या वेळेत मिळत नाहीत. त्याचबरोबर प्रकल्पांना निधी वेळेत मिळेलच याची खात्री नसते. प्रकल्प कागदावरून प्रत्यक्षात उतरेपर्यंत त्यात अनेक बदल होतात. प्रकल्पाची व्याप्ती वाढते. त्याच्या निविदेत बदल होतात. प्रकल्पासाठी लागणार्‍या यंत्रसामुग्रीतदेखील फरक पडतो. या सर्व कारणांमुळे मूळ प्रकल्पाचा खर्च वाढतो. तसेच या कंपनीला कंत्राट दिलेले असते. ती कंपनी सुधारित आराखडा वेळेवर देत नाही. त्यामुळे अनेक गोष्टींना विलंब होतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

एकूण 539 प्रकल्प रखडले आहेत. त्यापैकी 211 प्रकल्पांचा खर्च आणि पूर्ण होण्याचा कालावधीदेखील वाढला आहे. यातील सर्वाधिक प्रकल्प रेल्वेचे आहेत. त्यापाठोपाठ महामार्ग आणि पेट्रोलियमविषयक आहेत. दरम्यान 440 प्रकल्पांचा विलंब टाळण्यात यंत्रणांना यश आले आहे. हे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, असा दावा करण्यात आला आहे. 98 प्रकल्प त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा महिनाभर अधिक रखडतील. यापैकी 26 प्रकल्प किमान एक हजार कोटींचे आहेत. 907 प्रकल्पांची तारीख आणि ते पूर्ण होण्याचा कालावधी ठरलेला नाही. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पाच्या अधिकार्‍याला प्रकल्पाचे महत्त्वाचे टप्पे आणि निरीक्षण नोंदवण्यास सांगण्यात आले आहे.