Wed, May 12, 2021 01:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘26/11 कसाब आणि मी’ पुस्तकाचे आज प्रकाशन

‘26/11 कसाब आणि मी’ पुस्तकाचे आज प्रकाशन

Published On: Nov 25 2018 1:56AM | Last Updated: Nov 25 2018 1:44AMमुंबई : प्रतिनिधी

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईला टार्गेट करत समुद्रमार्गे आलेल्या त्या दहा अतिरेक्यांंनी 26 नोव्हेंबर 2008 साली दहशतवादी हल्ला केला होता. सोमवारी या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत असतानाच गुन्ह्याचे तपास अधिकारी रमेश महाले यांनी लिहिलेले ‘26/11 कसाब आणि मी’ हे पुस्तक प्रकाशीत होत आहे. 

राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून यावेळी मुंबई पोलीस दलातील कायदा व सुव्यवस्थाचे प्रमुख सह आयुक्त देवेन भारती यांची प्रमुख उपस्थीती असणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघातील लोकमान्य हॉलमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.

एकमेव जिवंत पकडल्या गेलेल्या पाकिस्तानी आतंकवादी अजमल कसाब याची तब्बल 81 दिवस केलेली कसून चौकशी, ‘साब अफझल गुरु को आठ साल सजा न दे सके तो मुझे क्या सजा दोगे’ या आत्मविश्‍वासाने बोलणार्‍या कसाबला अवघ्या चारवर्षांच्या आत फाशीपर्यंत पोहचवत त्यांच्या तोंडून ‘साब तूम जीत गये मै हार गया’ हे उद्गार काढणार्‍या महाले यांनी गुन्ह्याच्या तपासादरम्यान आलेले अनुभव, प्रत्यक्ष साक्षिदार, तांत्रीक आणि घटनास्थळांवरील पुरावे, परदेशामध्ये केलेला तपास असा सर्व प्रवास 31 कथांमधून उलघडला आहे. 

26/11 च्या हल्ल्याचा थरार मांडण्यासोबत महाले यांनी एक सामान्य नागरिक ते फिदाईन बनण्यापर्यंतचा कसाबचा झालेला प्रवास, पाकिस्तानमध्ये त्याच्यासह दहा आतंकवाद्यांना देण्यात आलेले सहा ते सात स्टेपचे प्रशिक्षण, कसाबच्या अटकेनंतर उठलेल्या अफवा, त्याने केलेले दावे, पुराव्यासह अफवा आणि कसाबच्या दाव्यांची केलेली पडताळणी, न्यायालयात चाललेले काम, कसाबने घेतलेले बचावाचे पवित्रे अशा आतापर्यंत न उलघडलेल्या घटना, गोष्टींबाबत महाले यांनी या पुस्तकात लिहीले आहे.