Wed, Aug 12, 2020 03:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिल्लीहून कल्याणला परतलेले २५ जण क्वारंटाईन

दिल्लीहून कल्याणला परतलेले २५ जण क्वारंटाईन

Last Updated: Apr 02 2020 8:22PM
कल्याण : पुढारी वृत्तसेवा 

दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातीच्या मर्कजमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले मात्र सहभागी न होताच परतलेल्या २५ जणांची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. त्यानंतर कल्याण गोविंदवाडी येथे शोध घेऊन आरोग्य विभागाच्या मदतीने त्यांना भिवंडी येथील टाटा आमंत्रण येथे क्वारंटाईन केले आहे. यासर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातीच्या मर्कजमध्ये सहभागी होऊन परतलेल्या नागरिकाचा केंद्र आणि राज्य शासनाकडून सर्व स्तरावर शोध सुरू आहे. कल्याण बाजार पेठ पोलिसांना २५ जण कल्याण-गोविंदवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गोविंदवाडी येथील एका इमारतीमधून २५ जणांना शोधले. मात्र, १८ तारखेपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात सहभागी न होताच आपण १२ तारखेला दिल्लीतून निघून आल्याचे या नागरिकांनी पोलिसांना सांगितले. आपण १३ मार्च रोजी कल्याणामध्ये आलो. त्यानंतर भिवंडीला निघून गेलो. तर ३० मार्च रोजी आपण परत कल्याणामध्ये आल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वांची रवानगी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मदतीने शासनाच्या भिवंडी गोवा नाका येथील टाटाच्या इमारतीतील क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात अली आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी याची माहिती दिली. या सर्वांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.