Sat, Jul 04, 2020 07:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात 24 तासांत 25 जणांचा मृत्यू

राज्यात 24 तासांत 25 जणांचा मृत्यू

Last Updated: Apr 10 2020 1:24AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

गुरुवारी राज्यात 25 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यात आज मृत्युमुखी पडलेल्या मुंबईतील नऊ, तर पुण्यात सात जणांचा समावेश आहे. आज कोरोनाच्या 229 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1364 झाली आहे. एकट्या मुंबईत 134 रुग्ण दिवसभरात वाढल्याने मुंबईचा आकडाही  776 वर गेला आहे. तर 125 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  

गुरुवारी दिवसभरात एका दिवसात आजवरचे सर्वाधिक रुग्ण नोंदविण्यात आले. एका दिवसात राज्यात वाढलेल्या रुग्णांची संख्या दोनशेपेक्षा अधिक आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि महानगरात रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 30 हजार 766 नमुन्यांपैकी 28 हजार 865जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 1364 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1142 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आतापर्यंत 125 कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 36 हजार 533 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 4731 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान, गुरुवारी मृत्यू पावलेल्या 25 कोरोना बाधितांमध्ये मुंबई 9, पुणे 7, तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.  दगावलेल्यांमध्ये 15 पुरुष तर 10 महिला आहेत. आज झालेल्या 25 मृत्यूपैकी 12 जण हे 60 वर्षांवरील आहेत तर मुंबईत निधन झालेल्या एका महिलेचे वय 101 वर्षे आहे. 11 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत तर दोघेजण 40 वर्षांपेक्षा लहान आहेत.